औरंगाबादची तहान भागविणाऱ्या जलवाहिनीचे वेल्डिंग निखळले, लाखो लिटर पाणी नाल्यात
By मुजीब देवणीकर | Updated: February 1, 2023 20:28 IST2023-02-01T20:28:38+5:302023-02-01T20:28:58+5:30
जलवाहिनी रिकामी करण्यासाठी पैठण रोडवर नाथ सिडस् येथे व्हॉल्व्ह उघडण्यात आला.

औरंगाबादची तहान भागविणाऱ्या जलवाहिनीचे वेल्डिंग निखळले, लाखो लिटर पाणी नाल्यात
औरंगाबाद: शहराची तहान भागविणाऱ्या १४०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे वेल्डींग जालाननगर उड्डाणपुलाजवळ बुधवारी सायंकाळी निखळले. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा बंद करून दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले. जलवाहिनी रिकामी करण्यासाठी पैठण रोडवर नाथ सिडस् येथे व्हॉल्व्ह उघडण्यात आला. त्यामुळे लाखो लिटर पाणी नाल्यात वाहत होते.
नवीन जलवाहिनीचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दीड वर्ष लागणार आहेत. तोपर्यंत मुदत संपलेल्या जुन्या जलवाहिनीच्या समांतर दुसरी ९०० व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. दरम्यान, जुन्या जलवाहिनीत सातत्याने बिघाड होतच आहे. यामुळे शहराचे पाणीच्या नियोजन पूर्ण ढेपाळले आहे. महापालिकेचे पथक जलवाहिनी दुरुस्तीसाठी सरसावली आहे.
शहराची तहान भागविण्यासाठी १९७५ मध्ये पहिल्यांदा जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकली. नंतर १९९२ मध्ये १४०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकली. या दोन्ही जलवाहिन्यांद्वारे १२० एमएलडी पाणी दररोज शहरात येते. शहराची तहान भागविण्यासाठी किमान २०० एमएलडी पाण्याची गरज आहे. कायमस्वरूपी शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी २७४० कोटी रुपयांच्या योजनेअंतर्गंत तब्बल २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे कामही सुरू आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी आणखी एक ते दीड वर्ष लागणार आहे.