शिवसेना आमदारांच्या बंडाळीने जिल्हा परिषद निवडणूकीत समीकरण बदलणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 15:21 IST2022-06-28T15:17:40+5:302022-06-28T15:21:45+5:30
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते गेल्याने जिल्ह्याच्या राजकारणावरही या बंडाळीचे दूरगामी परिणाम होतील.

शिवसेना आमदारांच्या बंडाळीने जिल्हा परिषद निवडणूकीत समीकरण बदलणार
औरंगाबाद : जिल्ह्यातील शिवसेनेच्या दोन मंत्र्यांसह पाच आमदारांनी बंडखोरी केल्याने जि. प.च्या आगामी निवडणुकीचे समीकरण बदलणार असल्याचे दिसून येते.
जि. प.वर एकहाती सत्ता आणण्याच्या स्वप्नाला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे पैठण विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आ. तथा रोहयोमंत्री संदीपान भुमरे, सिल्लोडचे आ. ग्रामविकास तथा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह वैजापूर मतदारसंघाचे शिवसेना आ. रमेश बोरनारे आणि औरंगाबाद पश्चिमचे आ. संजय शिरसाट, मध्यचे आ. प्रदीप जैस्वाल यांनी पक्षप्रमुखांविरोधात जाहीर बंड केल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते गेल्याने जिल्ह्याच्या राजकारणावरही या बंडाळीचे दूरगामी परिणाम होतील.
मावळत्या जि. प.त शिवसेनेचे १९ सदस्य निवडून आले होते. या सदस्यांमुळे जि. प. अध्यक्षपदी देवयानी डोणगावकर या पहिली अडीच वर्षे अध्यक्षा होत्या. २०१९ साली अब्दुल सत्तार हे शिवसेनेत प्रवेश करताना त्यांच्यासोबत काँग्रेसचे ६ सदस्य आल्याने शिवसेनेचे संख्याबळ २५ पर्यंत वाढले होते. आगामी जि.प. निवडणुकीत ७० सदस्य निवडले जातील. शिवसेनेचे दोन मंत्री आणि आमदारांच्या जोरावर आगामी निवडणुकीत जि. प.त शिवसेनेचे बहुमत असेल, असा विश्वास मावळते पदाधिकारी व्यक्त करीत होते. मात्र, आठ दिवसांपूर्वी झालेल्या भुमरे, सत्तार यांच्यासह पाच आमदारांच्या बंडखोरीने जि.प.चे राजकारणच बदलून गेले आहे. बंडखोरांकडून अद्याप शिवसेना सोडली नाही, असा दावा केला जात असला तरी शिवसेना पक्षात उभी फूट पडल्याने त्याचा फायदा अन्य पक्षांना होऊ शकतो.
मावळत्या जि. प.तील संख्याबळ
शिवसेना- १८
भाजप- २३
काँग्रेस- १६
राष्ट्रवादी काँग्रेस -३
मनसे- १
रिपाइं- १
-------
एकूण ६२