औरंगाबाद जिल्हापरिषदेत चुरस; महाविकास आघाडी की, भाजप मारणार बाजी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 13:02 IST2020-01-03T12:59:44+5:302020-01-03T13:02:43+5:30
औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीच्या पक्षांची तीन वर्षांपासून सत्ता आहे.

औरंगाबाद जिल्हापरिषदेत चुरस; महाविकास आघाडी की, भाजप मारणार बाजी ?
औरंगाबाद : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी शुक्रवारी (दि.३) होणाऱ्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडी सत्ता कायम राखणार की, भाजप चमत्कार घडविणार याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. भाजपने जोरदार तयारी केल्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीच्या पक्षांची तीन वर्षांपासून सत्ता आहे. ही सत्ता कायम राखण्याचा विश्वास शिवसेना, काँग्रेसचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. मात्र त्याच वेळी सर्वात मोठा पक्ष होऊनही सत्तेपासून वंचित राहिलेल्या भाजपने यावेळी सत्ता मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत.
सत्ता स्थापन करण्यासाठी ३१ सदस्यांचे संख्याबळ आवश्यक आहे. भाजपकडे स्वत:चे २३ सदस्य असून, त्यांना आठ सदस्य कमी पडत आहेत. आठ सदस्यांची संख्या जुळविण्यासाठी गंगापूरचे आमदार प्रशांत बंब, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड आणि अध्यक्षपदाच्या उमेदवार अनुराधा चव्हाण हे प्रयत्न करीत आहेत. चार सदस्यांचा पाठिंबा मिळविण्यात भाजप यशस्वी ठरली आहे. आणखी चार सदस्यांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. यात काँग्रेसच्या एका गटाला फोडण्यासह शिवसेनेतील असंतुष्ट सदस्यही गळाला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
याविषयी बोलण्यास भाजपचा एकही पदाधिकारी तयार नाही. मात्र शुक्रवारी जि.प.मध्ये चमत्कार होणार असल्याचा दावा केला जात आहे. त्याच वेळी महाविकास आघाडी भक्कम असल्याचेही शिवसेना नेत्यांकडून सांगितले जात आहे. जिल्ह्याला दोन मंत्रीपदे मिळाली असल्यामुळे शिवसेनेला जि.प.ची सत्ता ताब्यात ठेवणे अनिवार्य बनले आहे. त्याच वेळी भाजपही शिवसेनेला धक्का देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. काँग्रेसच्या काही सदस्यांना निवडणूक प्रक्रियेत अनुपस्थित राहण्यास भाग पाडत संख्याबळ कमी करण्यात येऊ शकते, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.
भाजपचे ठरले, शिवसेनेचे गुलदस्त्यात
भाजपकडून अध्यक्षपदासाठी अनुराधा चव्हाण यांचे नाव अंतिम करण्यात आले असल्याचे समजते. त्याच वेळी शोभा काळे यासुद्धा ऐनवेळच्या उमेदवार असू शकतात. मात्र शिवसेनेच्या गोटातून कोणाला उमेदवारी मिळणार याविषयीचा निर्णय गुलदस्त्यात आहे. मातोश्रीवरून उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही वेळ आधी अध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव सुचविले जाईल, अशी पक्षाच्या गोटात चर्चा सुरू आहे.
अशी होणार निवडणूक : जि. प. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी शुक्रवारी निवडणूक होणार आहे. यात सकाळी १० ते १२ या वेळेत दोन्ही पदांसाठी सदस्यांना अर्ज करता येणार आहेत. यानंतर दुपारी २ वाजता विशेष सभेचे आयोजन केले असून, सभेच्या सुुरुवातीला दहा मिनिटे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी देण्यात येतील. त्यानंतर मतदानाची प्रक्रिया सुरू होईल. सुरुवातीला अध्यक्षपदासाठी हात उंचावून मतदान केले जाईल. त्यानंतर उपाध्यक्षपदासाठी हात उंचावून मतदान होईल. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे हे असणार आहेत.