वर्चस्व कोणाचे; भाजपच्या कराड, सावे, केणेकर यांच्यात सुप्त संघर्ष ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 07:28 PM2020-09-02T19:28:26+5:302020-09-02T19:37:16+5:30

भाजपच्या रखडलेल्या शहर व जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार होताच अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले.

In Aurangabad tussle between BJP's Karad, Save, Kenekar ? | वर्चस्व कोणाचे; भाजपच्या कराड, सावे, केणेकर यांच्यात सुप्त संघर्ष ?

वर्चस्व कोणाचे; भाजपच्या कराड, सावे, केणेकर यांच्यात सुप्त संघर्ष ?

googlenewsNext
ठळक मुद्दे घोषणेवेळी अनुपस्थित संजय केणेकरांनी घेतली कार्यकारिणीची बैठकएकाच मंडळातील अनेकांना कार्यकारिणीत घेतल्याने खदखद भाजपतील अंतर्गत कलह कार्यकारिणीच्या नियुक्तीवरून पुढे आला

औरंगाबाद : नव्याने खासदार झालेले डॉ. भागवत कराड यांचा शहर भाजपात स्वतंत्र गट अस्तित्वात येत आहे. याशिवाय शहर कार्यकारिणीवर वर्चस्व निर्माण केलेले पूर्व विधानसभेचे आमदार अतुल सावे यांनी मतदारसंघात इतरांना हस्तक्षेप करू  दिलेला नाही, तसेच शहरावर वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्न असलेले भाजपचे नूतन शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्याशी सावेंचा सुप्त संघर्ष सुरू झाला असल्याचे मागील काही घटनांवरून दिसून येत आहे.

भाजपच्या रखडलेल्या शहर व जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार होताच अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेला अनुपस्थित राहिलेले शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी सोमवारी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला खा. डॉ. भागवत कराड, आ. अतुल सावे यांच्यासह वरिष्ठ भाजप नेते गैरहजर असल्याचे दिसून आले.
भाजपची शहर व जिल्हा कार्यकारिणी सहा महिने नावांवर एकमत होत नसल्यामुळे रखडली होती. ज्या कार्यकर्त्यांना महापालिकेची निवडणूक लढवायची आहे, त्यांना संघटनेत पदे देण्यात येऊ नयेत, पक्षासाठी पूर्णवेळ काम करणारांना पदे देण्यात यावीत, असा एक मतप्रवाह होता. मात्र मंत्री, आमदार, खासदारांनी स्वत:च्या अवतीभोवती असणाऱ्यांची वर्णी कार्यकारिणीवर लावल्याचे समोर आले. यात दीपक ढाकणे, संदीप चव्हाण, रामेश्वर भादवे, चंद्रकांत हिवराळे, दिलीप थोरात, गोविंद केंद्रे, दिव्या मराठे आदींना मुख्य कार्यकारिणीवर घेण्याचा आग्रह शहराध्यक्ष केणेकर गटाकडून करण्यात येत होता. मात्र, यातील अनेकांना सेल किंवा आघाड्यांवर समाधान मानावे लागले, तर काहींना कोठेही संधी मिळाली नाही. 

एकाच मंडळातील असलेले गणेश नावंदर, शिवाजी दांडगे, रेखा पाटील, नितीन खरात यांना उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि चिटणीस पदावर स्थान मिळाल्याचेही समोर आले. एकाच मंडळातील चार जणांना संधी मिळत असेल तर शहरातील इतर मंडळातील पदाधिकाऱ्यांना संधी नाकारल्याचा संदेश यातून गेला असल्याचेही आ. सावे विरोधी गटाचे मत आहे. याशिवाय  मंगलशास्त्री मूर्ती,  दयाराम बसैये यांच्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याविषयी एक मतप्रवाह पक्षात होता. मात्र, त्याविषयी ऐकूनही घेण्यात आले नसल्याची समजते. अध्यक्ष असूनही आपण सुचविलेल्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नसल्यामुळे नाराज केणेकरांनी पत्रकार परिषदेकडे पाठ फिरवली होती. 

मात्र, कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर चोवीस तासांच्या आत त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यासाठी भाजपच्या शहर कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीला खा. डॉ. कराड, आ. सावे यांच्यासह इतर प्रदेश पदाधिकारी अनुपस्थित होते. यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. भाजपतील अंतर्गत गटबाजीचा पहिला अंक पार महापालिका निवडणुकीपर्यंत भाजपतील मतभेद विकोपाला जातील, असेही एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

बहुजन विरुद्ध सवर्ण 
निवडणुकीच्या काळात बहुजनांना वापरून घेण्यात येते. मात्र, पदे देण्याची वेळ आली असता त्यांना डावलत नेत्यांच्या मागे-पुढे फिरणाऱ्यांना संधी दिली जात असल्याचा आरोप पक्षांतर्गत चर्चेत केला जात आहे. हा वाद महापालिका निवडणुकीत अधिक वाढण्याची शक्यता आहे.

नाराजांना संधी देऊ
शहर आणि जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर काही जण नाराज असल्याचे दिसून आले. मात्र, प्रत्येकालाच संधी देणे शक्यत नसते. त्यामुळे नाराज असलेल्या कार्यकर्त्यांना आगामी काळात नक्कीच विचार करीत संधी देण्यात येईल.
- डॉ. भागवत कराड, खासदार

आम्ही सर्वजण एकच
आमच्यात कोणतीही गटबाजी नाही. सर्वजण एक आहोत. शहराध्यक्षांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कार्यकारिणी जाहीर केली. त्यामुळे आलो नाही, तसेच सोमवारी कार्यकारिणीची बैठक ही नियुक्तीपत्र देण्याविषयी होती. त्यामुळे गैरहजर होतो.
- अतुल सावे, आमदार

सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग
शहर कार्यकारिणी निवडताना सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला आहे. दलित, ओबीसी समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व दिले. मात्र, प्रत्येकालाच न्याय देता येत नाही. काही जण नाराज होत असतात. येणाऱ्या काळात नाराजांना संधी देण्यात येईल. 
- संजय केणेकर, शहराध्यक्ष 

Web Title: In Aurangabad tussle between BJP's Karad, Save, Kenekar ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.