औरंगाबाद मनपाच्या तिजोरीत खडखडाट, तरीही ८० कोटींचे होणार रस्ते
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 18:19 IST2023-02-11T18:18:29+5:302023-02-11T18:19:53+5:30
४० किमीचे रस्ते होणार, निविदा भरण्यास ३ मार्चची मुदत

औरंगाबाद मनपाच्या तिजोरीत खडखडाट, तरीही ८० कोटींचे होणार रस्ते
औरंगाबाद : महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही अर्थसंकल्पात तरतूद केल्याप्रमाणे यंदा ८० कोटी रुपयांचे सिमेंट रस्ते करण्यात येणार आहेत. गुरुवारी महापालिका प्रशासनाने चार पॅकेजमध्ये निविदा प्रसिद्ध केली. या रस्त्यांची लांबी ४० किमी राहणार असून, निविदा भरण्याची अंतिम तारीख ३ मार्च असणार आहे. मागील काही दिवसांपासून निविदा प्रसिद्ध करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या.
स्मार्ट सिटीअंतर्गत ३१८ कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे सध्या सुरू आहेत. महापालिका निधीतून २०० कोटींचे रस्ते करण्याचे उद्दिष्ट मनपाने ठेवले होते. आर्थिक स्थिती पाहता एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे करणे अशक्यप्राय ठरत होते. अखेर प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी ८० कोटी रुपयांचे रस्ते करण्यास दोन दिवसांपूर्वी मंजिरी दिली. मागील महिन्यातच या कामांची निविदा प्रसिद्ध करण्यात येणार होती. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाल्याने मनपाला निविदा काढता आली नाही.
यासंदर्भात अधिक माहिती देताना डॉ. चौधरी यांनी सांगितले की, चार पॅकेजमध्ये निविदा प्रसिद्ध करण्यात आली. २४ फेब्रुवारी रोजी प्री-बीड बैठक घेण्यात येईल. यामध्ये इच्छुक कंत्राटदारांच्या सूचना हकरती स्वीकारण्यात येतील. ३ मार्चपर्यंत निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत असेल. ६ मार्च रोजी निविदा उघडण्यात येतील. दरम्यान, मनपाने ठरविलेल्या वेळापत्रकानुसार सर्व सुरळीत झाले, तर मार्चअखेर प्रशासनाला या कामांचा नारळ फोडता येईल.
कंत्राटदार प्रतिसाद देतील का?
८० काेटींच्या रस्त्याची कामे मनपा निधीतून होणार असल्याने कंत्राटदार कितपत प्रतिसाद देतील, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. मनपाकडून बिल देण्यास बराच विलंब करण्यात येतो. त्यामुळे कंत्राटदार पुढे येण्याची शक्यता कमी आहे. निविदा आल्या तरी त्या अधिक दराने येतील, असेही गृहीत धरण्यात येत आहे. या कामांना शासन निधी मिळाला असता तर कंत्राटदारांच्या उड्या पडल्या असत्या.