महापालिका वॉर्ड आरक्षणाची ‘आर्थिक’ गैरव्यवहाराने सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 01:10 PM2020-02-07T13:10:23+5:302020-02-07T13:16:22+5:30

८५ ठिकाणी बदलल्या सीमा, हद्दी, नद्या, नाले, डी. पी. रस्त्याच्या नियमांचे उल्लंघन

Aurangabad Municipality ward 'reservation' of financial deal | महापालिका वॉर्ड आरक्षणाची ‘आर्थिक’ गैरव्यवहाराने सोडत

महापालिका वॉर्ड आरक्षणाची ‘आर्थिक’ गैरव्यवहाराने सोडत

googlenewsNext
ठळक मुद्देसर्व वॉर्डांसाठी नव्याने सोडत घेण्याची मागणी १५ नगरसेवकांसाठी हा पूर्ण खेळ करण्यात आल्याचा आरोप

औरंगाबाद : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका एप्रिल-२०२० मध्ये होणे संभाव्य असून, या निवडणुकीसाठी वॉर्डनिहाय जात प्रवर्गांसाठी आरक्षित केलेल्या वॉर्डांच्या सोडतीत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत विद्यमान, इच्छुक नगरसेवकांनी केला. 

८५ ठिकाणी वॉर्डांच्या सीमा, हद्दी, नद्या, नाले, डी. पी. रस्त्यांच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याने सर्व वॉर्डांसाठी नव्याने सोडत घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. इम्युनेशन ब्लॉक बदलून चक्रानुक्रमानुसार येणारे वॉर्ड आरक्षण पुन्हा जुन्या आरक्षणासाठीच काही ठिकाणी लागू करून सोडत काढण्यात आली. काही वॉर्ड थेट आरक्षित करण्यात आले. यामुळे लोकशाहीचा गळा घोटला गेला असून, १५ नगरसेवकांसाठी हा पूर्ण खेळ करण्यात आल्याचा आरोप यावेळी सभागृहात करण्यात आला. या सगळ्या प्रकारात शिवसेनेने भाजपकडे तर भाजपने शिवसेनेकडे बोट                 दाखविले. दरम्यान महापौर नंदकुमार घोडेले यांनी ११ फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदवू शकता, असा सल्ला देऊन त्यांनी आरोप-प्रत्यारोपांना कलाटणी दिली. वॉर्ड आरक्षण सोडत, प्रारूप वॉर्ड रचना हे दोन्ही विषय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

सभेत शिवसेना सदस्य सीताराम सुरे यांनी वॉर्ड रचनेवर आक्षेप घेऊन वॉर्ड अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी कोणत्या नियमाने झाला आहे, याचा खुलासा वॉर्ड रचनेचा प्रस्ताव तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून घेण्याची मागणी केली. हा विषय सर्वसाधारण सभेच्या अखत्यारीत येतो का? याचा खुलासा करावा, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रमोद राठोड, राजू शिंदे यांनी केली. त्यांच्या मागणीवर शिवसेना, काँग्रेस, एमआयएमचे नगरसेवक संतापले. तुम्हाला मर्जीप्रमाणे आरक्षण मिळाले आहे. हा सगळा डाव भाजपने देवेंदत्त फडणवीस मुख्यमंत्री असल्यापासून केल्याचा आरोप काँग्रेसचे अफसर खान यांनी केला. भाजपचे नाही तर महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपची एवढी ताकद असल्याचे तुम्हाला वाटत असेल तर तुमचे अभिनंदन, असा चिमटा शिंदे यांनी खान यांना काढला.

शिल्पाराणी वाडकर, रेशमा कुरेशी, रामेश्वर भादवे आदींनी प्रारूप वॉर्ड रचना, सोडतीवर आक्षेप घेतला. प्रारूप वॉर्ड रचनेवर भाजपने सावध भूमिका घेत हा विषय सर्वसाधारण सभेत चर्चेचा आहे काय? अशा प्रश्न उपस्थित केला. तसेच राज वानखेडे यांनी दुसरा विषय काढल्याने इतर नगरसेवक संतापले. वानखेडे यांना थांबवून महापौरांनी नगरसेवकांना बोलण्याची संधी दिली. या विषयावर विधिज्ञांचा सल्ला घेतो, असे सांगत महापौरांनी सभा तहकूब केली. त्यानंतर सभेला सुरुवात होताच महापौर म्हणाले, विधिज्ञ व महापालिकेच्या विधि सल्लागारासोबत चर्चा केली. सर्वसाधारण सभेत या विषयावर निर्णय देता येणार नाही. 

एन-१ वॉर्ड पुन्हा एस. सी. कसा
सिडको एन-१ हा वॉर्ड पुन्हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित होऊ शकतो तर जयभीमनगर-घाटी वॉर्ड का नाही? यामागे कुठेतरी पाणी मुरते आहे. अनेकांना सोयीचे वॉर्ड करून देण्यात आले आहेत. यात एमआयएमचे नुकसान करण्यासाठी डाव रचल्याचा आरोप एमआयएमचे गटनेते गंगाधर ढगे यांनी केला. मध्य व पूर्व मतदारसंघातील सात वॉर्ड कमी करून आमच्या पक्षाला संपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.

आमचे नशीब अधिकाऱ्यांनी ठरविले 
मयूरबन कॉलनी, बुढीलेन, पुंडलिकनगर, देवानगरी-प्रतापनगर, मयूरनगर-सुदर्शननगर, आविष्कार कॉलनी या वॉर्डांना आरक्षण का लागू झाले नाही? आमचे नशीब चिठ्ठ्यांनी नाही तर अधिकाऱ्यांनी संगनमत करून ठरविले असल्याचा आरोप रामेश्वर भादवे यांनी केला. चक्रानुक्रमे उतरत्या क्रमाने वॉर्डांना आरक्षण केल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. परंतु नऊ वॉर्डांना हे आरक्षण का लागू झाले नाही, असा सवालही त्यांनी केला

ब्रिजवाडीचे अस्तित्व संपविले 
नगरसेविका सुरेखा सानप म्हणाल्या, ब्रिजवाडी वॉर्डाचे अस्तित्वच संपविले आहे. वॉर्डाचे दहा तुकडे करण्यात आले आहेत. विष्णूनगर वॉर्डात जुन्या दोनच गल्ल्या जोडल्या असून, नियमांची पायमल्ली करून कारस्थान केल्याचा आरोप नितीन साळवी यांनी केला. दरम्यान माजी नगरसेवक भगवान रगडे म्हणाले, ब्रिजवाडी वॉर्ड हरवला आहे. वॉर्डाचे नाव, भाग, क्षेत्रफळात जी नावे  आहेत, ती दुसऱ्या वॉर्डाची आहेत. याबाबत पोलिसांत तक्रार करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 

Web Title: Aurangabad Municipality ward 'reservation' of financial deal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.