राजकीय वरदहस्त असणारा महापालिका अधिकारी लाच घेताना पकडला; नागरिकांनी फोडले फटाके
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 10:53 IST2022-04-30T10:51:50+5:302022-04-30T10:53:00+5:30
सातारा, देवळाई परिसरातील नागरिकांच्या गुंठेवारीचे नियमितीकरण करण्यासाठी चामलेकडून नागरिकांची प्रचंड आर्थिक पिळवणूक करण्यात येत होती.

राजकीय वरदहस्त असणारा महापालिका अधिकारी लाच घेताना पकडला; नागरिकांनी फोडले फटाके
औरंगाबाद : महापालिकेतील बड्या राजकीय नेत्यांचा वरदहस्त असलेला नगररचना विभागातील प्रभारी अभियंता तथा गुंठेवारी कक्षप्रमुख संजय लक्ष्मण चामले याला तीन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. तक्रारदार बिल्डरकडे ले-आऊट मंजूर करून देण्यासाठी सहा लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील पहिल्या हप्त्यापोटी तीन लाख स्वीकारताना पकडण्यात आल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
महापालिकेतील भ्रष्टाचाराचे कुरण असलेल्या नगररचना विभागात प्रभारी अभियंता म्हणून संजय चामले हा कार्यरत होता. मागील काही दिवसांपासून गुंठेवारी विभागाचा कक्षप्रमुखही करण्यात आले होते. त्याच्याविषयी नागरिकांच्या प्रचंड तक्रारी होत्या. मात्र, राजकीय वरदहस्तामुळे त्याच्याविरोधात कारवाई करण्यात येत नव्हती. सातारा परिसरातील एका बिल्डरकडून एका कामासाठी १० लाख रुपये घेतले होते. त्यानंतरही ले-आऊटच्या तीन फाईल मंजूर करण्यासाठी ६ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील पहिल्या हप्त्यापोटी ३ लाख रुपये देण्याचे ठरले होते. मात्र, तक्रारदारास पैसे देण्याची इच्छा नसल्यामुळे एसीबीचे अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्याकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सातारा परिसरातील चामले याच्या घरीच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्यानुसार तक्रारदाराकडून तीन लाख रुपयांची रोख रक्कम स्वीकारताना चामले यास पथकाने रंगेहात पकडले. ही कामगिरी अधीक्षक डॉ. खाडे यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक रूपचंद वाघमारे यांच्या पथकाने केली.
एका प्रस्तावासाठी दोन लाख
नगररचना विभागात ले-आऊटसाठी प्रस्ताव दाखल झाल्यानंतर त्याच्या मंजुरीसाठी २ लाख रुपये देण्याचा अलिखित नियमच होता. प्रस्ताव दाखल झाल्यानंतर टोकन म्हणून एक लाख रुपये द्यावे लागत होते. उर्वरित एक लाख रुपये ले-आऊट मंजूर केल्यानंतर द्यावे लागत होते.
सातारा, देवळाईत फुटले फटाके
लाच घेताना पकडलेला चामले हा गुंठेवारी विभागाचा प्रमुख होता. सातारा, देवळाई परिसरातील नागरिकांच्या गुंठेवारीचे नियमितीकरण करण्यासाठी चामलेकडून नागरिकांची प्रचंड आर्थिक पिळवणूक करण्यात येत होती. त्याला लाच घेताना पकडल्याची माहिती मिळताच नागरिकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. नागरिकांमध्ये चामलेच्या विविध किस्स्यांची चर्चाही करण्यात येत होती.