औरंगाबादेत बीड बायपासवर भरधाव जीपने दुचाकीस्वाराला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 18:34 IST2018-09-06T18:33:20+5:302018-09-06T18:34:32+5:30
प्रवेशबंदी सुरू असताना आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास भरधाव जीपचालकाने दुचाकीस्वाराला चिरडले.

औरंगाबादेत बीड बायपासवर भरधाव जीपने दुचाकीस्वाराला चिरडले
औरंगाबाद: बीड बायपासवरील अपघात रोखण्यासाठी शहर पोलिसांनी जडवाहनांना सकाळी आणि सायंकाळी प्रवेशबंदी केली. ही प्रवेशबंदी सुरू असताना आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास भरधाव जीपचालकाने दुचाकीस्वाराला चिरडले. भगवान गंगाधर शेळके(४५,रा. शिवशाहीनगर, मुकुंदवाडी)असे मृताचे नाव आहे. हा अपघात सहारा सिटीसमोर घडला.
याविषयी अधिक माहिती देताना एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की, भगवान शेळके हे गांधेली शिवारातील सहारा सिटी येथे एका ठेकेदाराकडे पाच महिन्यापासून काम करतात. नेहमीप्रमाणे आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मोटारसायकलने कामावर जात होते. सहारा सिटीमध्ये जाण्यासाठी ते बायपास ओलांडत असताना जालन्याकडून देवळाईचौकाकडे सुसाट निघालेल्या जीपचालकाने त्यांना उडवले. हा अपघात एवढा भीषण होता की, भगवान यांना दुचाकीसह जीपने बायपासवरून सहारा सिटीच्या रस्त्यावर सुमारे शंभर फुट फरफटत नेले. या घटनेत भगवान हे घटनास्थळीच ठार झाले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात जीपचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी सांगितले.