४५ वर्षांत खंडपीठाने दिले ३१ न्यायमूर्ती, ४ मुख्य न्यायमूर्ती व सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायमूर्ती
By प्रभुदास पाटोळे | Updated: September 2, 2025 19:15 IST2025-09-02T19:13:46+5:302025-09-02T19:15:43+5:30
Aurangabad High Court Legacy: औरंगाबाद खंडपीठ वर्धापन दिन विशेष

४५ वर्षांत खंडपीठाने दिले ३१ न्यायमूर्ती, ४ मुख्य न्यायमूर्ती व सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायमूर्ती
छत्रपती संभाजीनगर : २७ ऑगस्ट रोजी असलेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा ४५ वा वर्धापन दिन आज २ सप्टेंबर २०२५ रोजी साजरा होत आहे. औरंगाबाद खंडपीठातील नवनियुक्त न्या. सिद्धेश्वर ठोंबरे, न्या. वैशाली जाधव आणि न्या. आबासाहेब शिंदे हे आजच न्यायमूर्तिपदाची शपथ घेत आहेत, हा ‘दुग्धशर्करा योग’च म्हणावा लागेल.
औरंगाबाद खंडपीठाने ४५ वर्षांत मुंबई उच्च न्यायालयाला ३ महिला आणि २८ पुरुष असे ३१ न्यायमूर्ती दिले. त्यापैकी मुंबई, कर्नाटक, राजस्थान आणि मद्रास राज्याच्या उच्च न्यायालयांना मुख्य न्यायमूर्ती आणि सर्वोच्च न्यायालयाला एक न्यायमूर्ती दिले. राज्य वकील परिषदेच्या अध्यक्षपदी ६ वकील विराजमान झाले. उच्च न्यायालयाने १३ आणि सर्वोच्च न्यायालयाने ३ अशा एकूण १६ वकिलांना ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून नामनिर्देशित (नॉमिनेटेड) केले. ही खंडपीठ वकील संघासाठी गर्वाची बाब आहे. खंडपीठाने आतापर्यंत १२ जिल्ह्यांतील असंख्य पक्षकारांना न्याय दिला, देत आहे आणि देत राहणार, यात शंका नाही.
खंडपीठाने दिले ३१ न्यायमूर्ती
औरंगाबाद खंडपीठाने न्या. बी.एन. देशमुख, न्या. एन.पी. चपळगावकर, न्या.बी.एच. मर्लापल्ले, न्या.एस.बी. म्हसे, न्या.एन.एच. पाटील, न्या. ए.बी. नाईक, न्या. एस.बी. देशमुख, न्या. ए.एच. जोशी, न्या. एस.सी. बोरा, न्या. आर.एम. बोर्डे, न्या. एस.एस. शिंदे, न्या. के.यू. चांदीवाल, न्या.पी.बी. वराळे, न्या. एस.व्ही. गंगापूरवाला, न्या. साधना एस. जाधव, न्या. एस.पी. देशमुख, न्या. आर.व्ही. घुगे, न्या. ए.डी. उपाध्ये, न्या. एन.बी. सूर्यवंशी, न्या. एम.जी. सेवलीकर, न्या. ए.एस. वाघवसे, न्या. किशोर संत, न्या. संतोष चपळगावकर, न्या. शैलेश ब्रह्मे, न्या. मंजूषा देशपांडे, न्या. सचिन देशमुख, न्या. महेंद्र नेरलीकर, न्या. अजित कडेठाणकर, न्या. सिद्धेश्वर ठोंबरे,न्या. वैशाली पाटील जाधव आणि न्या. आबासाहेब शिंदे हे न्यायमूर्ती दिले.
४ राज्यांचे मुख्य न्यायमूर्ती व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तिपद न्या. एन.एच. पाटील यांनी राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तीपद न्या. एस.एस. शिंदे यांनी, मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तिपद न्या. एस.व्ही. गंगापूरवाला यांनी आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तिपद न्या. पी.बी. वराळे यांनी भूषविले, तर न्या.पी.बी. वराळे सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी विराजमान आहेत.
वकील परिषदेचे अध्यक्ष व १६ ज्येष्ठ विधिज्ञ
मुंबई आणि गोवा वकील परिषदेचे अध्यक्षपद ॲड. राजेंद्र रघुवंशी, ॲड. विजयकुमार साकोळकर, ॲड. सतीश तळेकर, ॲड. नितीन एल. चौधरी यांनी भूषविले. सध्या ॲड. अमोल सावंत अध्यक्षपदी विराजमान आहेत. उच्च न्यायालयाने के.जी. नावंदर, पी.आर. देशमुख, पी.एम. शहा, पी.व्ही. मंडलिक, व्ही.जे. दीक्षित, आर.एन. धोर्डे, व्ही.डी. होन, आर.एस. देशमुख, व्ही.डी. सपकाळ, संजीव देशपांडे, दिलीप बनकर पाटील, प्रशांत कातनेश्वरकर आणि एन.बी. खंदारे यांना, तर सर्वोच्च न्यायालयाने ए.एम. कानडे, सुधांशू चौधरी आणि संजय खर्डे यांना ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून नामनिर्देशित केले आहे.