औरंगाबादमध्ये आधार, रेशन कार्डची बनावटगिरी उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:06 IST2018-03-23T00:05:11+5:302018-03-23T00:06:48+5:30
बनावट रेशन कार्ड, आधार कार्ड आणि मतदार कार्ड तयार करणाऱ्या एका मल्टी सर्व्हिसेस सेंटरवर गुन्हेशाखा पोलिसांनी गुरुवारी रात्री धाड मारून रॅकेटचा पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली

औरंगाबादमध्ये आधार, रेशन कार्डची बनावटगिरी उघडकीस
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बनावट रेशन कार्ड, आधार कार्ड आणि मतदार कार्ड तयार करणाऱ्या एका मल्टी सर्व्हिसेस सेंटरवर गुन्हेशाखा पोलिसांनी गुरुवारी रात्री धाड मारून रॅकेटचा पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून बनावट रेशन कार्ड, आधार कार्ड, २९ बनावट जात प्रमाणपत्र आणि मतदार कार्ड तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. ही कारवाई हडको कॉर्नर परिसरात झाली.
मोहम्मद हबीब मोहम्मद हनीफ (२८,रा.कोतवालपुरा), सय्यद हमीद सय्यद हबीब (४५,रा. मुजफ्फरनगर) आणि पूनमचंद दिगंबरसा गणोरकर (५२, रा. एन-१२, हडको) अशी आरोपींची नावे आहेत. गुन्हेशाखा पोलिसांनी सांगितले की, हडको एन-१३ येथील न्यू आधार मल्टी सर्व्हिसेसमध्ये बनावट रेशन कार्ड, आधार कार्ड आणि मतदार कार्ड तयार करण्यात येत असल्याची माहिती खबºयाने पोलिसांना दिली. माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि कर्मचाºयांनी गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास तेथे धाड मारली. त्यावेळी तेथे एकाच व्यक्तीचे छायाचित्र असलेली वेगवेगळी नावे आणि क्रमांक असलेली तीन ते चार आधार कार्ड, जिल्हा अन्न-धान्य वितरण अधिकारी यांची बनावट स्वाक्षरी असलेले बनावट रेशन कार्ड मिळाले एवढेच नव्हे आधार कार्ड, मतदार कार्ड आणि रेशन कार्ड तयार करण्यासाठी आरोपींनी तयार केलेले बनावट शिक्के, यासोबत शहरातील विविध शासकीय अधिकाºयांच्या नावाचे शिक्के, लॅपटॉप, संगणक, मोबाईल, असा किमती ऐवज मिळाला. आरोपी सय्यद हमीद यास ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपी पूनमचंद याच्या घरावर धाड मारली. यावेळी त्याच्या घरातूनही बनावट रेशन कार्ड जप्त केले. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हबीब (रा. कोतवालपुरा) हा असल्याचे समजताच पोलिसांनी त्याच्या घरावर धाड मारली. तेथे पोलिसांना मतदार कार्ड तयार करण्यासाठी लागणारा चंदेरी होलोग्रामचा साठा मिळाला.
आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हेशाखेत आणल्यानंतर पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी त्यांची कसून चौकशी केली.
यावेळी सुरुवातीला उडवा-उडवीची उत्तरे देणारे आरोपी उपायुक्तांच्या खाक्यासमोर पोपटासारखे बोलू लागले.
पोलिसांनी प्रथम मल्टी सर्व्हिसेस सेंटरवर धाड मारून तेथील आक्षेपार्ह ऐवज जप्त केला. ही कारावई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त सी.डी.शेवगण, पो.नि. शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोहेकॉ सुभाष शेवाळे, रेखा चांदे, पोलीस कर्मचारी सुधाकर राठोड, विजयानंद गवळी, सय्यद अशरफ, लालखा पठाण, योगेश गुप्ता, सिद्धार्थ थोरात, नंदलाल चव्हाण, धर्मराज गायकवाड, नितीन धुळे यांनी केली.
शंभरहून अधिक बनावट रेशन कार्ड जप्त
आरोपींकडून बीपीएल नागरिकांसाठी शासनाने जारी केलेले पिवळ्या रंगाचे ४४ रेशन कार्ड आणि मध्यमवर्गीयांसाठीचे केशरी रंगाचे ६७ रेशन कार्ड, बनावट जात प्रमाणपत्र मिळाले. यासोबतच आरोपींनी तयार केलेले १९ बनावट आधार कार्ड, कलर प्रिंटर, स्कॅनर, लॅपटॉप, संगणक, शिक्के आणि इतर वस्तू जप्त केल्याची माहिती पो.नि.कांबळे यांनी दिली.