औरंगाबादेत मांडूळ विक्री करणारे दोघे गजाआड; गुन्हे शाखेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 14:01 IST2018-02-17T14:00:16+5:302018-02-17T14:01:05+5:30
मांडूळ या वन्य प्राण्याची अवैधरित्या विक्री करण्यास आलेल्या दोघांना गुन्हे शाखेने शुक्रवारी ताब्यात घेतले.

औरंगाबादेत मांडूळ विक्री करणारे दोघे गजाआड; गुन्हे शाखेची कारवाई
औरंगाबाद : मांडूळ या वन्य प्राण्याची अवैधरित्या विक्री करण्यास आलेल्या दोघांना गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री ७.३० च्या दरम्यान ताब्यात घेतले. त्यांच्याकडून काळ्याबाजारात विक्रीसाठी आणलेले दोन मांडूळ हस्तगत करण्यात आले आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी कि, वाळूज पंढरपूर येथे शुक्रवारी संध्याकाळी दोघेजण मांडूळ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांना खबऱ्याकडून मिळाली. यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या पथकाने औरंगाबाद- अहमदनगर रोडवरील सुंदर आर्केड येथे सापळा रचला. रात्री ७.३० वाजेच्या दरम्यान दीपक मोरे व सुनील चव्हाण हे दोघे या ठिकाणी आले असता त्यांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन मांडूळ हस्तगत करण्यात आले. जंगलात खोदकाम करताना दोन्ही मांडूळ सापडले असून त्याची प्रत्येकी ५५ लाखाला विक्री करणार होतो अशी माहिती त्या दोघांनी दिली.
यानंतर दोन्ही मांडूळ खुल्ताबाद वन विभागाचे एम.पी. कांबळे, ए.टी. पाटील, एस.वाय. गावंदर यांच्या सुपूर्द करण्यात आली आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त यशस्वी यादव, उप आयुक्त डॉ. दिपाली धाटे - घाडगे, सहाय्यक आयुक्त रामेश्वर थोरात, पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.