रांजणगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत मध्यरात्री चोरीचा प्रयत्न; तिजोरी न उघडल्याने ठेवी सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 19:31 IST2025-10-29T19:31:16+5:302025-10-29T19:31:40+5:30
सकाळी बँकेचे कर्मचारी कामकाज सुरू करण्यासाठी आले असता, बँकेच्या शटरवरील दोन्ही कुलूप तोडलेले त्यांना आढळले.

रांजणगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत मध्यरात्री चोरीचा प्रयत्न; तिजोरी न उघडल्याने ठेवी सुरक्षित
वाळूज महानगर : रांजणगाव (शेणपुंजी) येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. मात्र चोरट्यांना बँकेतील तिजोरी उघडण्यात अपयश आल्याने मोठी आर्थिक हानी टळली. ही घटना मंगळवार, दि. २८ रोजी सकाळी उघडकीस आली असून, परिसरात यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रांजणगाव (शेणपुंजी) येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा असून, नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी बँकेचे कर्मचारी कामकाज सुरू करण्यासाठी आले असता, बँकेच्या शटरवरील दोन्ही कुलूप तोडलेले त्यांना आढळले. आत प्रवेश केल्यावर काही साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. तात्काळ ही बाब त्यांनी वरिष्ठांना तसेच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याला कळवली. पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक, श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून चोरट्यांचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. श्वान पथकाने परिसरात काही अंतरापर्यंत शोध घेतला, मात्र अद्याप ठोस धागा मिळालेला नाही.
पोलिसांना असेही आढळून आले की, चोरट्यांनी बँकेच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे दुसऱ्या दिशेने वळवले होते. बँकेची तिजोरी उघडण्याचा चोरांनी प्रयत्न केला असला तरी ती उघडण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे बँकेतील ठेवी सुरक्षित आहेत. घटनास्थळ गजबजलेल्या भागात आहे. चोरीचा प्रयत्न कसा झाला, चोरटे कोणत्या दिशेने आले आणि किती जण होते, याबाबत पोलिस तपास सुरू आहे. परिसरातील इतर व्यावसायिक प्रतिष्ठानांमधील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात असून, त्यावरून आरोपींचा मागोवा काढला जात आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले.