क्लास संपवून निघालेल्या ११ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; सतर्क नागरिकांमुळे दुर्घटना टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 11:34 IST2025-07-17T11:32:42+5:302025-07-17T11:34:06+5:30

सहा महिन्यांनी चैतन्य तुपे अपहरणाच्या घटनेची पुनरावृत्ती

Attempted kidnapping of 11-year-old girl who left class; Alert citizens avert major tragedy | क्लास संपवून निघालेल्या ११ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; सतर्क नागरिकांमुळे दुर्घटना टळली

क्लास संपवून निघालेल्या ११ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; सतर्क नागरिकांमुळे दुर्घटना टळली

छत्रपती संभाजीनगर : खोकडपुऱ्यातील जमीन व्यावसायिकाच्या ११ वर्षीय नातीचा कारमधून आलेल्या पाच जणांच्या टोळीने अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीची रोज ने- आण करणारा चालक, स्थानिक तरुणांनी जिवाची बाजी लावत अपहरणकर्त्यांचा पाठलाग केला. त्यामुळे मुलीला अर्ध्या रस्त्यात सोडून अपहरणकर्त्यांनी पोबारा केला. गारखेड्यातील नाथ प्रांगण ते शिवाजीनगर या ५०० मीटर अंतरात घडलेल्या या थरारानंतर ३५० मीटर अंतरावर रस्ताच न समजल्याने साराराजनगरमध्ये अपहरणकर्त्यांना कार सोडून पळावे लागले. बुधवारी सायंकाळी ०७.३० वाजता ही शहराला हादरवून सोडणारी घटना घडली.

११ वर्षीय मुलगी नेहा (नाव बदलले आहे) आजी- आजोबासोबत (आईचे माता- पिता) खोकडपुऱ्यात राहते. नेहाला आई नसून, वडील हैदराबादला असतात. तिच्या आजोबांचा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे. सहावीत शिकणारी नेहा नाथ प्रांगणात ट्यूशनसाठी येते. याच अपार्टमेंटमध्ये तिची मावशीही राहते. नेहा कारचालकासह बुधवारी सायंकाळी ०५:०० वाजता ट्यूशनसाठी गेली होती. सायंकाळी साधारण ०७.१५ वाजता ट्यूशन संपल्यानंतर ती खाली आली. चालक नवनाथ भीमराव छेडे हे कार घेऊन उभेच होते. तेव्हा त्यांच्या दिशेने तिशीतल्या एका तरुणाने जात मुका असल्याचे भासवत पत्ता विचारण्याचे नाटक करीत त्यांना गुंतवून ठेवले. तेवढ्यात सुसाट कारमधून इतरांनी उतरत नेहाला कारमध्ये टाकून निघण्याचा प्रयत्न केला.

छेडे यांनी जिवाची बाजी लावली
नेहाला कारमध्ये टाकताच छेडे यांनी अपहरणकर्त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कारमध्ये घुसून नेहाला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. मागे बसलेल्या अपहरणकर्त्यांनी त्यांच्यावर चाकूने वार केला. या झटापटीत एका अपहरणकर्त्यासह नेहालादेखील दुखापत होऊन रक्तस्राव झाला. छेडे यांना ढकलून देत अपहरणकर्ते शिवाजीनगरच्या दिशेने सुसाट निघाले.

वाहतुकीचा अडथळा, नेहाला रस्त्यात दिले सोडून
नेहा, छेडे यांची आरडाओरड ऐकून तेथे राहणारे शिल्पा चुडीवाल, श्रीकांत तोवर पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी धाव घेतली. ते पाहून तेथून जाणाऱ्या तरुणांनीही कार अडवण्याचा प्रयत्न केला. काहींनी दगडही फेकले. छेडे वेगात कारच्या मागे पळत सुटले. अपहरणकर्त्यांनी कार शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या दिशेने वळवली. क्रिस्टल वाइन शॉपसमोर वाहनांची गर्दी असल्याने अपहरणकर्त्यांच्या कारचा वेग कमी झाला. पाठलाग सुरू असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी नेहाला तेथेच सोडून पोबारा केला. कारचा पाठलाग करणाऱ्यांनी तत्काळ नेहाला रस्त्याच्या बाजूला बसवले. हा थरार, आरडाओरडा पाहून बघ्यांची गर्दी जमली. स्थानिकांनी नेहाला धीर दिला. तिला खाऊ, पाणी दिले. एका रिक्षाचालकाने तिला पुन्हा नाथ प्रांगणाजवळ आणून सोडले. घटनेची माहिती कळताच सहायक आयुक्त डॉ. रणजीत पाटील, निरीक्षक कृष्णा शिंदे घटनास्थळी दाखल झाले.

रस्ताच सापडला नाही
क्रिस्टल वाइन शॉपसमोर नेहाला सोडल्यानंतर अपहरणकर्त्यांनी कार महावितरणच्या कार्यालयाकडून तुळजाभवानी चौकातून भारतनगरच्या दिशेने नेली. मात्र, साराराजनगरमध्ये अरुंद गल्लीबोळांत रस्ताच संपल्याने कार पुढे नेण्यास दिशाच सापडली नाही. परिणामी, कार तशीच सोडून त्यांनी पळ काढला

Web Title: Attempted kidnapping of 11-year-old girl who left class; Alert citizens avert major tragedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.