कंत्राटदार असल्याचे सांगत बीएसएनएलचे ३ लाखांचे कॉपर वायर चोरण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 13:31 IST2025-07-19T13:31:39+5:302025-07-19T13:31:54+5:30

जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर घटना, पोलिसांच्या सतर्कतेने चोर रंगेहाथ सापडले, दोघे पसार

Attempt to steal BSNL copper wire worth Rs 3 lakhs by pretending to be a contractor | कंत्राटदार असल्याचे सांगत बीएसएनएलचे ३ लाखांचे कॉपर वायर चोरण्याचा प्रयत्न

कंत्राटदार असल्याचे सांगत बीएसएनएलचे ३ लाखांचे कॉपर वायर चोरण्याचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर : बीएसएनएलचे कंत्राटदार असल्याचे भासवून ६ जणांच्या टोळीने बीएसएनएलचे भूमिगत कॉपर वायर कापून चोरण्याचा प्रयत्न केला. गस्तीवरील पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी विचारपूस केली. त्यांना उत्तर देताना भंबेरी उडताच दोघांनी पळ काढला. चार चोर रंगेहाथ हाती लागले. १७ जुलै रोजी पहाटे ४.३० ते ५.३० दरम्यान हा चोरीचा प्रकार उघडकीस आल्याचे वेदांतनगरच्या पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी सांगितले. या वायरची किंमत लाखोंच्या घरात आहे.

किरण गोविंद शिखत (४०, रा. संभाजी कॉलनी, एन-६), इम्रान बशीर शेख (५५), राजू अयुब करीम शेख (३३) व मिनीनाथ पोपट वागसकर (३३, तिघेही रा. अहिल्यानगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक रात्रगस्तीवर होते. जिल्हा न्यायालयाच्या परिसरात, जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर बीएसएनएलच्या भूमिगत वायरसोबत छेडछाड सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना विचारपूस केली असता त्यांनी बीएसएनएलचे कंत्राटदार असल्याचे सांगितले. दुरूस्ती काम सुरू असल्याचे सांगितले. प्रश्नांची उत्तरे देताना काहींची भंबेरी उडाल्याचे पाहून अंमलदारांनी पोलिसी खाक्या दाखवला. आपला भांडाफोड होत असल्याचे लक्षात आल्यावर दोघांनी पळ काढला. चौघे पोलिसांच्या हाती लागले. घटनेची माहिती कळताच बीएसएनएलचे अधिकारी सागर पारचे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

३ लाखांच्या वायरचे तुकडे केले
या चोरीच्या कटात अहिल्यानगर येथील बीएसएनएलच्या काही जुन्या कंत्राटदारांचा सहभाग असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. सदर कॉपर वायरची किंमत बाजारात लाखो रुपये असून ते कुठे असते, कसे कापावे, याची पूर्ण माहिती कंत्राटदारांनाच असते. पळून गेलेल्यांमध्ये कंत्राटदार असल्याचेही पोलिसांनी सांगितले. पोलिस पोहोचेपर्यंत टोळीने जवळपास ३ लाख २२ हजारांच्या वायरचे तुकडे करून ठेवले होते.

Web Title: Attempt to steal BSNL copper wire worth Rs 3 lakhs by pretending to be a contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.