कैद्याचा पळून जाण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:38 IST2019-05-11T23:38:26+5:302019-05-11T23:38:40+5:30
हर्सूल कारागृहात सोडण्यासाठी नेण्यात येणाऱ्या कैद्याने पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडल्याने पुढील अनर्थ टळला.

कैद्याचा पळून जाण्याचा प्रयत्न
औरंगाबाद : हर्सूल कारागृहात सोडण्यासाठी नेण्यात येणाऱ्या कैद्याने पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना शनिवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास हडको टी पॉइंट येथे घडली.
रूपसिंग चतुरसिंग टाक (२३, रा.सारंगधरनगर, सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. याविषयी सिटीचौक ठाण्याचे निरीक्षक दादासाहेब सिनगारे यांनी सांगितले की, आरोपी टाक याला परभणी पोलिसांनी लुटमारीच्या गुन्ह्यात अटक केली होती.
न्यायालयाच्या आदेशाने परभणीचे पोलीस टाक याला घेऊन हर्सूल कारागृहात सोडण्यासाठी आले होते. हडको टी पॉइंट येथे ते असताना आरोपी टाकने पोलिसांच्या हाताला झटका देऊन धूम ठोकली. मात्र पोलिसांनी आरडाओरड करीत त्याचा पाठलाग सुरू केल्याने पळताना तो काही अंतरावर पडला. पाय मुरगळल्याने पळता येत नसल्यामुळे पोलिसांनी त्याला पकडले. याप्रकरणी पोलीस नाईक साहेबराव म्हस्के यांनी सिटीचौक ठाण्यात टाक विरोधात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.