दुकानफोडीच्या वाढत्या घटनेने व्यापाऱ्यांत चिंतेचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 19:22 IST2020-08-07T19:20:53+5:302020-08-07T19:22:13+5:30
दरवर्षी ४ ते ५ अशा घटना घडत असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.

दुकानफोडीच्या वाढत्या घटनेने व्यापाऱ्यांत चिंतेचे वातावरण
औरंगाबाद : एकच दुकान दोन महिन्यांत चोरट्यांनी दुसऱ्यांदा फोडले. यामुळे मोंढ्यात व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दुकानफोडीची ही पहिली घटना नसून दरवर्षी चार ते पाच दुकाने फोडली जातात. लाखो रुपयांचे समान चोरी होते. विशेष म्हणजे रविवारी सुटीच्या दिवशीच मोंढ्यात दुकानफोडीच्या घटना घडल्या आहेत.
मोंढा रविवारी बंद असतो. २ आॅगस्ट रोजी मध्यरात्री विष्णुकांत दरख यांचे किराणा दुकान फोडून चोरट्यांनी संगणक, डीव्हीआर, सीसीटीव्ही, टीव्ही चोरला. एवढेच नव्हे तर काजू, बदाम हा सुकामेवा सुमारे ५० हजारांचा माल चोरला. दरवर्षी ४ ते ५ अशा घटना घडत असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. ३० जुलै २०१९ रोजी येथील होलसेल व्यापारी विनोद लाहोटी यांच्या दुकानातून सुमारे ४ लाख रुपयांचे तुपाचे डबे चोरीला गेले होते. त्याच बाजूचे तीर्थकर या दुकानातही चोरी झाली होती. ते चोर अजूनही पकडले गेले नाहीत.
येथील व्यापारी संजय कांकरिया यांच्या जुन्या दुकानातून मागील वर्षी दीड लाख रुपयांचे सामान चोरले होते. मात्र, पोलिसांनी आठ दिवसांत सराईत चोरांना पकडले होते. पूर्वी सागर ट्रेडिंग दुकानात नेहमी चोरी होत असे. अखेर त्या दुकानदाराने आपले दुकान बंद केले, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
तीन पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोंढा
विशेष म्हणजे जुना व नवा मोंढा हा परिसर एक, दोन नव्हे तर चक्क तीन पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो. क्रांतीचौक पोलीस स्टेशन, सिटीचौक पोलीस स्टेशन व जिन्सी पोलीस स्टेशनचा समावेश होतो.
लुटमारीच्या घटना
तीन वर्षांपूर्वी नव्या मोंढ्यातील श्रीकांत खटोड हे किराणा व्यापारी सकाळी दुकान उघडत असताना त्यांच्या हातातील बँग हिसकावून चोर पळून गेले होते. त्या बँगमध्ये २ लाख रुपये होते. इंदरचंद पगारिया दुकान बंद करून निघाल्यावर त्यांचा पाठलाग चोरट्यांनी घरापर्यंत केला होता. हातातील बँग हिसकावून नेण्याच्या तीन, चार घटना दरवर्षी मोंढ्यात घडत असतात. या वाढत्या घटनांमुळे येथील व्यापारी हैराण झाले आहेत.
नवीन पोलीस चौकी उभारावी
मोंढ्यात जुनी पडीत पोलीस चौकी पाडून तेथे नवीन पोलीस चौकी उभारण्यास जनरल किराणा मर्चंट असोसिएशन प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार आहे. पोलिसांनी मोंढ्यात रात्री पेट्रोलिंग वाढवावी, अशी आम्ही मागणी केली आहे.
- नीलेश सेठी, अध्यक्ष, जनरल किराणा मर्चंट असोसिएशन
३६० डिग्री फिरणारा सीसीटीव्ही बसवा
पोलिसांनी मोंढ्यात ३६० डिग्री फिरणारा सीसीटीव्ही बसवावा. त्यास व्यापारी सहकार्य करतील. दरवर्षी ४ ते ५ दुकाने फोडली जातात, व्यपाऱ्यांच्या हातातील पैशाची बॅग पळविणे, लुटमारीच्या घटना घडत असतात. पोलीस चौकी उभारण्यास व्यापारी तयार आहेत. फक्त तेथे २४ तास पोलीस असणे आवश्यक आहे.
-संजय कांकरिया, उपाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ