चोरीच्या टेम्पोतून वेरूळमधून एटीएमच उचलले; टोळी छत्रपती संभाजीनगरात सापडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 19:33 IST2025-09-23T19:32:05+5:302025-09-23T19:33:37+5:30

पैशांतून तत्काळ वाहन, महागड्या मोबाइलची खरेदी : टोळीचा पर्दाफाश; पडेगावमध्ये कापून १६ लाख रक्कम ढापली, ४ जण जेरबंद, म्होरक्या फरार

ATM stolen from Verul in stolen tempo; Gang found in Chhatrapati Sambhajinagar | चोरीच्या टेम्पोतून वेरूळमधून एटीएमच उचलले; टोळी छत्रपती संभाजीनगरात सापडली

चोरीच्या टेम्पोतून वेरूळमधून एटीएमच उचलले; टोळी छत्रपती संभाजीनगरात सापडली

छत्रपती संभाजीनगर : चोरीच्या टेम्पोतून वेरूळमधील एटीएम मशीन चोरी करणारी टोळी शहरातीलच निघाली. स्थानिक गुन्हे शाखेने दहा दिवस सखोल तपास करत चार जणांना अटक केली. म्होरक्याच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे. लुटलेल्या १६ लाख ७७ हजार रकमेपैकी ४ लाख़ १४ हजार रोख, एअरगन, चाकू, तलवारीसह अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले.

दयासिंग गुलजारसिंग टाक (४५, रा. टी.व्ही. सेंटर), जीवन विजय वाघ (२८, मूळ रा. सिल्लोड), सतबीरसिंग हरबनसिंग कलानी (२१, रा. उस्मानपुरा), युवराज उर्फ इल्लम बाळासाहेब मंडोरे (४४, रा. बनेवाडी) यांना अटक केली आहे. म्होरक्या आकाश नरसिंग बावरे (रा. जालना) याचा शोध सुरू आहे. ११ सप्टेंबर रोजी रात्री १२ ते पहाटे ३ वाजेदरम्यान वेरूळमधील कैलास हॉटेलसमोर एसबीआयचे एटीएम मशीन टेम्पोमधून चोरून नेले होते. पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपासात चोरांची टोळी पडेगावला जाऊन थांबल्याचे निष्पन्न झाले.

चोरीसाठी सिडकोतून टेम्पो चोरला
चोरीसाठी या टोळीने आदल्या दिवशी सिडकोच्या भक्तीनगरमधून टेम्पो चोरला. तो सतबीरसिंगने चोरल्याचे पथकाला समजले. सोमवारी तो पडेगावला मित्राला भेटण्यासाठी गेल्याचे कळले. पथकाने पडेगावच्या जीवनच्या घराजवळ धाड टाकली, तेव्हा चौघेही दुसऱ्या गुन्ह्याची आखणी करत होते.

नव्या घरात कापले एटीएम
तारांगण सोसायटीमागे जीवन वाघच्या बांधकाम सुरू असलेल्या नव्या घरात विद्युत प्रवाह घेऊन ग्रँडरच्या साह्याने एटीएम मशीन कापले. त्यातील रक्कम १६ लाख ७७ हजारांची वाटणी केली. पैकी ४ लाख ४ हजार रुपये जप्त करण्यात आले. पैसे मिळताच टाकने नवी दुचाकी, तर जीवनने ५० हजारांचा मोबाइल खरेदी केला. गुन्ह्यातील वाहन, ७ मोबाइल, ड्रील मशीन, इलेक्ट्रिक कटर, वायर, हातोडा, टॉर्च, एअरगन, चाकू आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले.

गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी
आकाश व दयासिंगवर चोरी, लूटमार, दरोड्याचे १७ ते २० गुन्हे नोंद आहेत. निरीक्षक विजयसिंह राजपूत, सपोनि सुधीर मोटे, फौजदार महेश घुगे, अंमलदार सचिन राठोड, श्रीमंत भालेराव, प्रमोद पाटील, अनिल चव्हाण, जनाबाई चव्हाण, कविता पवार, बलबीरसिंग बहुरे, आनंद घाटेश्वर, शिवाजी मगर, योगेश तरमाळे, जीवन घोलप यांनी कारवाई पार पाडली.

Web Title: ATM stolen from Verul in stolen tempo; Gang found in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.