चिकलठाणा येथे ‘एटीएम’वर खळ्ळखट्याक्; सीसीटीव्ही कॅमेरे उखडून टाकले
By साहेबराव हिवराळे | Updated: April 1, 2023 20:37 IST2023-04-01T20:36:55+5:302023-04-01T20:37:30+5:30
मशिनसह काचावर घातले दगड; एटीएमवर हल्ला करणारे नेमके चोर की ग्राहक, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

चिकलठाणा येथे ‘एटीएम’वर खळ्ळखट्याक्; सीसीटीव्ही कॅमेरे उखडून टाकले
छत्रपती संभाजीनगर: जालना रोडवरील चिकलठाणा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘एटीएम’वर खळ्ळखट्याकचा आवाज झाला. दगड घालून व एटीएमचा ‘स्क्रीन बोर्ड’ही फोडण्याचा व कॅश लुटण्याचा प्रयत्न शनिवारी पहाटे घडला. स्थानिक नागरिकांनी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याला कळविल्याने त्वरित पोलिस घटनास्थळी दाखल झाले, परंतु तोडफोड करणारे येथून फरार झाले होते.
एटीएमवर हल्ला करणारे नेमके चोर की ग्राहक, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बँक ऑफ इंडियाचे हे एटीएम असून, नुकतेच येथील जुने एटीएम मशिन काढून येथे नवीन आधुनिक पद्धतीचे डिजिटल एटीएम बसविण्यात आले आहे. बँकेचे अधिकारी ठाण्यात बोलविण्यात आले असून, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अधिक तपास केला जाणार आहे. सीसीटीव्हीचे फुटेज सिडको पोलिस हस्तगत करीत असून, त्यातील रेकार्डिंगवरून एटीएमवर हल्ला करणारे चोर होते की ग्राहक, या दोन्ही दृष्टीने सिडको एमआयडीसी पोलिस तपास करीत, असे पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांनी सांगितले.
एटीएमसोबत छेडछाडीचा आला फोन...
एटीएम हे राजू म्हस्के पाटील यांच्या शाॅपमध्ये असून, त्यांना पहाटे ३.४५ वाजता फोन आला. त्यानंतर, काही वेळात पोलिसांना संपर्क केला. तेथे सिडको एमआयडीसी पोलिस आले. पोलिस आल्यावर साउंडवर एटीएमविषयी माहिती विचारली जात होती. एटीएमला छेडछाड करणाऱ्याविषयी बोलत असल्याने, राउंडवर आलेल्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधून एटीएम सुरक्षित असल्याचे म्हस्के यांनी सांगितले.