आरक्षण सोडतीत इच्छुकांचा जल्लोष, छत्रपती संभाजीनगर मनपात ११५ जागांपैकी ५८ महिलांना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 19:43 IST2025-11-12T19:42:46+5:302025-11-12T19:43:19+5:30
सोडत पद्धतीने आरक्षण काढताना इच्छुकांच्या जाेरदार शिट्ट्या, जल्लोष पाहायला मिळाला. ज्यांच्या प्रभागात नको असलेले आरक्षण पडले त्यांचे चेहरे हिरमुसले होते.

आरक्षण सोडतीत इच्छुकांचा जल्लोष, छत्रपती संभाजीनगर मनपात ११५ जागांपैकी ५८ महिलांना!
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील ११५ सदस्य निवडण्यासाठी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निकषांचे तंतोतंत पालन करीत आरक्षण काढण्यात आले. सोडत पद्धतीने आरक्षण काढताना इच्छुकांच्या जाेरदार शिट्ट्या, जल्लोष पाहायला मिळाला. ज्यांच्या प्रभागात नको असलेले आरक्षण पडले त्यांचे चेहरे हिरमुसले होते.
जी. श्रीकांत यांनी अगोदर आरक्षण प्रक्रियेची माहिती दिली. २०११ च्या जनगणनेची लोकसंख्या १२ लाख २८ हजार ३२ ही असून, अनुसूचित जातीची २ लाख ३८ हजार १०५ आणि अनु. जमातीची लोकसंख्या १६ हजार ३२० ही ग्राह्य धरून एकूण लोकसंख्या भागिले अनु. जातीची लोकसंख्या गुणीले ११५ जागा याप्रमाणे प्रथम अनुसूचित जातीसाठी २२ जागा उतरत्या क्रमाने आरक्षित करण्यात आल्या.
प्रभाग क्रमांक ६, १०, ११, १२, १३, १४, १६ हे सात प्रभाग वगळून उर्वरीत २२ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आली. त्यानंतर २२ चिठ्ठ्या टाकून त्यातून ११ महिलांसाठी राखीव जागा करण्यात आल्या. त्यानंतर एसटी प्रवर्गासाठी प्रभाग १ आणि प्रभाग ४ आरक्षित करण्यात आले. त्यापैकी प्रभाग १ मधील अ ही जागा महिलांसाठी राखीव राहील, असे जाहीर केले.
ओबीसी, सर्वसाधारण आरक्षण
ओबीसी प्रवर्गासाठी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार २७ टक्के आरक्षण गृहीत धरून ३१ जागा राखीव केल्या. आरक्षणासाठी प्रभाग तर २९ आहेत, उर्वरित दोन जागांचे काय? असा प्रश्न होता. त्यासाठीही आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार सात प्रभागातून दोन जागा विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून निश्चित करण्यात आल्या. ३१ जागांमध्ये दोन प्रभागात प्रत्येकी दोन इतर मागासप्रवर्गासाठी जागा आरक्षित झाल्या. त्यातून १६ जागा महिलांसाठी चिठ्ठी काढून आरक्षित करण्यात आल्या. त्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रत्येक प्रभागात क या ठिकाणी एक जागा निश्चित करून एका प्रभागात दोन जागा राहिल्या.
इच्छुकांच्या प्रश्नावर पिकली खसखस
आरक्षणासाठी अ, ब, क, ड अशी नावे दिली. नेमक्या कोणत्या भागाचे आरक्षण निघत आहे, हे काही नवीन उमेदवारांना समजत नव्हते. एका उमेदवाराने प्रशासक यांना प्रश्न केला. प्रशासकांनी प्रभागाविषयी माहिती दिली. जुनी वॉर्ड पद्धत विसरा असे सांगितले. मनपा ही प्रक्रिया समजावून सांगण्यात कमी पडली का? असा प्रश्न इच्छुकाने केला. त्यावर प्रशासकांनी तुम्ही समजून घेण्यात कमी पडले, असा टोला मारताच सभागृहात एकच खसखस पिकली.