पुराचा अंदाज न आल्याने शेतमजूर बैलगाडीसह गेला वाहून
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 12:48 IST2023-09-30T12:47:14+5:302023-09-30T12:48:16+5:30
शेतमजूर, बैलजोडी आणि एका म्हशीचा आढळला मृतदेह

पुराचा अंदाज न आल्याने शेतमजूर बैलगाडीसह गेला वाहून
कळमनुरी/आखाडा बाळापूर ( हिंगोली): कळमनुरी तालुक्यातील सालापूर येथे शुक्रवारी ( दि. २९ ) सायंकाळी लेंडी ओढ्याला पूर आला होता. अचानक आलेल्या पुराचा अंदाज न आल्याने शेतमजूर बैलगाडी, दोन म्हशीसह बुडाला. यात शेतमजूर, बैलजोडी आणि एका म्हशींचा मृतदेह आढळून आला आहे.
भीमराव साधुजी धुळे (६०, रा. सालेगाव) हे सालेगाव येथील दिगंबर हरजी कदम यांच्याकडे सालदार म्हणून काम करत. शुक्रवारी शेतातून परत येत असताना अचानक जोरदार पाऊस झाला. यामुळे लेंडी ओढ्याला पूर आला. सायंकाळी धुळे हे बैलगाडीस दोन म्हशी बांधून गावाकडे परतत होते. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांनी ओढा पार करण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा वेग जास्त असल्याने बैलगाडी उलटल्याने धुळे पाण्यात बुडाले. तसेच बैलजोडी आणि म्हशी देखील बांधल्या गेल्याने बुडाले.
दरम्यान, संध्याकाळी उशिरापर्यंत भीमराव धुळे हे घरी परत न आल्यामुळे त्यांची शोधा शोध सुरू होती. लेंडी ओढ्याच्या काही अंतरावर भीमराव धुळे यांचा, व दोन बैल एक म्हशीचा मृतदेह आढळून आला व एक म्हैस अजूनही बेपत्ता आहे. मयत भीमराव धुळे यांचा मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे.