करोडोंचा घोटाळा करणाऱ्या क्लर्क हर्षकुमारच्या मैत्रिणीची दिवसभर झाडाझडती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 12:19 IST2024-12-30T12:19:05+5:302024-12-30T12:19:15+5:30
२१ कोटींचा अपहार प्रकरण : पोलिस आयुक्तालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक

करोडोंचा घोटाळा करणाऱ्या क्लर्क हर्षकुमारच्या मैत्रिणीची दिवसभर झाडाझडती
छत्रपती संभाजीनगर : राज्यभर गाजत असलेल्या विभागीय क्रीडा संकुलातील २१.५९ कोटींचा घोटाळ्यातील मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याच्या मैत्रिणीची रविवारी दिवसभर पोलिस आयुक्तालयात झाडाझडती घेण्यात आली. विशेष म्हणजे स्वत: पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. त्याशिवाय आयुक्तांनी आयुक्तालयात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठकही घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्य शासनाचे पैसे असलेल्या विभागीय क्रीडा संकुलातील २१.५९ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात गुन्हा नोंदविल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने कंत्राटी लेखा लिपिक योशदा जयराम शेट्टी आणि तिचा पती जीवन कार्यप्पा विंजडा उर्फ बी. के. जीवर या दोघांना अटक केली होती. त्यांना १ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आलेली आहे. त्याचवेळी पोलिसांनी मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर हा फरार असून, त्याची मुंबईतील मैत्रीण अर्पिता वाडकर हिला शनिवारी पोलिसांनी अटक केली. हर्षकुमारने या घोटाळ्यात अर्पितालादेखील भागीदार केले होते. तिच्या नावावर विमानतळासमोर असलेल्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये दीड कोटींचा फ्लॅट घेतला. अलोकनगर येथेदेखील एक फ्लॅट तिच्याच नावे केला, तर हर्षकुमारने मुंबईतदेखील २ बीएचके फ्लॅट स्वतःच्या नावे खरेदी केल्याचे समोर आले आहे.
अर्पिताच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होण्याची होऊ शकतात. हर्षकुमारच्या बाबतीत तिला बऱ्यापैकी माहिती असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. तिची पोलिस कोठडीची मुदत सोमवारी पूर्ण होत असल्यामुळे तिला न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तिची चौकशी केली. तसेच रविवारी पोलिस आयुक्तालयात क्रीडा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सलग सातव्या दिवशी चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. यासोबतच इंडियन बँकेच्या अधिकाऱ्यांचीदेखील चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.