महिनाभरात दोनदा वाद, तिसऱ्यांदा भर रस्त्यात तलवार, चाकूने सतरा वार करीत तरुणाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 12:03 IST2025-11-01T12:02:39+5:302025-11-01T12:03:01+5:30
शहाबाजार मधील निशांत दर्गाजवळ नशेखोरांचा क्रुर थरार; पाळत ठेवून हत्या, गुन्हे शाखा, सिटीचौक पोलिसांकडून रात्री ११ वाजेपर्यंत चार हल्लेखोर ताब्यात

महिनाभरात दोनदा वाद, तिसऱ्यांदा भर रस्त्यात तलवार, चाकूने सतरा वार करीत तरुणाची हत्या
छत्रपती संभाजीनगर : महिन्याभरात दोनदा झालेल्या वादातून नशेखोरांच्या टोळीने समीर खान ईनायत खान (३०, रा. काचीवाडा, शहाबाजार) यांची भर रस्त्यावर तलवार, चाकुने गळा, पोटात तब्बल सतरा वार करुन क्रुर हत्या केली. शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता शहाबाजारातील निशांत दर्गा जवळ हा हत्येचा थरार घडला. या हत्येमुळे शहरात पुन्हा नशेखोरीसह गुंडांचा वाढता आत्मविश्वास गंभीर वळणावर गेल्याचे अधोरेखीत झाले.
समीर खान शहागंजमध्ये भाजी विक्री करत होते. काही दिवसांपासून त्यांचे त्याच परिसरातील फळ विक्रेते, भाजी विक्रेत्यांसोबत वाद सुरू होते. २७ ऑक्टोबर रोजी फळ विक्रेता आसिफ रायडर, हफिज उर्फ टकला, शोएब अन्वर खान उर्फ काला यांनी जुुन्या वादातून मारहाण केली होती. २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता पुन्हा पंचायत समिती कार्यालयासमोर ट्रॅव्हल्स चालक शोएब अन्वर खान याच्यासोबत समिर यांचे वाद होत तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटाने एकमेकांवर शस्त्राने वार केले. यात समीर व शोएबच्या तक्रारीवरुन दोन्ही गटावर परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले होते.
'तुझे किसी के हाथ से मार दुुंगा', धमकीच्या चौथ्या दिवशी हत्या
-वाद वाढल्यानंतर आसिफ रायडरने समिर यांना २८ ऑक्टोबर रोजी कॉल केला. 'तुझे किसी के हाथ से मार दुंगा, तेरा मर्डर करुंगा' अशी धमकी दिली हाेती. ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता समीर मित्र शारेक बाली सोबत मित्राला भेटण्यासाठी शहाबाजार मध्ये गेले होते.
-यावेळी तोंड बांधलेल्या चार हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. भर रस्त्यावर दुचाकी थांबवून त्यांच्यावर चौघांनी हल्ला चढवला. तलवार व चाकुने तब्बल १७ वार करत गळा व पोट कापले. एकाने त्यांचा उजवा पाय गुडघ्यापासून तोडून सर्व पसार झाले.
-घटनेची माहिती कळताच पोलिस आयुक्त सुधीर हिरमेठ, पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, क्रांतीचौकचे निरीक्षक सुनिल माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. समीरचा जागीच मृत्यू होऊन संपुर्ण रस्त्यावर रक्त पसरले होते. शेकडोंचा जमाव जमा झाला होता.
तीन पथके कामाला लागली, चार हल्लेखोर रात्री ताब्यात
भररस्त्यावर झालेल्या हत्येमुळे शहर पोलिस हादरुन गेले. गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, सुनिल माने यांच्यासह उपनिरीक्षक अजित दगडखैर, अर्जुन कदम, संदिप काळे अंमलदार दिलीप मोदी, राजेंद्र साळुंके, आनंद वाहुळ यांचे पथक हल्लेखोरांच्या शोधासाठी रवाना झाले. त्यात समीरच्या पत्नीने वादाची पार्श्वभुमी सांगितल्याने सहा ते सात जणांवर संशय बळावला होता. रात्री ११ वाजेपर्यंत मुख्य हल्लेखोर इस्लाम खान खमर खान उर्फ असलम चाऊस (२७, रा. शहागंज), मोहम्मद नासिर मोहम्मद फारुख उर्फ इता (३२, रा. रशीदपुरा), इसरार खान निसार खान (२३) व सोहेब अन्वर खान उर्फ काला (२१, दोघे रा. पंचायत समितीच्या मागे) यांना ताब्यात घेण्यात आले. सर्व हल्लेखोर एका गोठ्यात लपून बसले होते. सहायक निरीक्षक मनोज शिंदे या हत्येचा अधिक तपास करत आहेत.
तर हत्या टळली असती
शहागंज मधील भाजीविक्रेते, फळ विक्रेत्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहेत. स्थानिकांच्या माहितीनुसार, या परिसरात सातत्याने नशेखोर विक्रेत्यांचा वावर वाढला आहे. समीर व अन्य गुंंडांच्या वादात दोन गुन्हे दाखल झाले. त्यात वेळीच आवश्यक कारवाई झाली असती तर हत्या टळली असती, असेही स्थानिकांनी सांगितले. मात्र, मारहाणीचा गुन्हा म्हणुन त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली गेल्याचेही पोलिसांनी सांगितले.