मैत्रिणीवरून वाद विकोपाला, संतापाच्या भरात एकाच्या डोक्यावरच बंदूक रोखली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 15:40 IST2025-11-28T15:39:46+5:302025-11-28T15:40:01+5:30
सलीम अली सरोवर परिसरातील घटना, कंत्राटदाराच्या मुलाला अटक, अन्य दोघे पसार

मैत्रिणीवरून वाद विकोपाला, संतापाच्या भरात एकाच्या डोक्यावरच बंदूक रोखली
छत्रपती संभाजीनगर : मैत्रिणीशी बोलण्यावरून उच्चभ्रू कुटुंबातील तरुणांमध्ये वाद झाला. एकाने थेट डोक्यावर बंदूक रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दि. २६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता सलीम अली सरोवर परिसरात हा प्रकार घडला. यात सिटीचौक पोलिसांनी मध्यरात्रीतून शेख मुज्जमिल ताहेर शेख (१८) याला अटक केली. सोहेल व अरमान सय्यद नावाचे त्याचे मित्र पसार झाले आहेत.
शहवेज आयान जैदी (१८, रा. मॉडल हाऊसिंग सोसायटी, हिमायत बाग) हा विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. तो मित्र सॅवियो फर्नांडिस, अफान सय्यद, मोईस बागवान, जैद शेख, रैयानसोबत सलीम अली सरोवर परिसरातील डिलक्स बेकरीच्या साइटवर होता. तेवढ्यात त्यांच्याजवळ आलिशान गाडीतून सोहेल, मुज्जमिल व अरमान सय्यद गेले. शहवेजचा टीशर्ट पकडून 'तुने मेरे फ्रेंड्स से बात क्यू की' असे म्हणत मारहाण केली. शहवेजने त्याला 'मैने उसका मोबाइल नंबर ब्लाॅक किया है' असे सांगितले. मात्र, तेवढ्यात मुज्जमिलने गाडीतून लोखंडी रॉड काढून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. बरगड्यात मारहाण केली. साेहेलने खिशातून बंदूक काढून थेट त्याच्या डोक्यावर ठेवत 'आज तुझे खत्म कर दुँगा' अशी धमकी दिली. तेवढ्यात शहवेज व त्याच्या मित्रांनी पळ काढला. एसबीएच कॉलनीत लपून त्याने वडिलांना प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबाने धाव घेत सिटीचौक पोलिस ठाणे गाठले.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार व आरोपी सर्व उच्चभ्रू कुटुुंबातील आहेत. मुज्जमिलचे वडील कंत्राटदार असून, सोहेलचे वडील भंगार व्यावसायिक आहेत. मैत्रिणीवरून त्यांच्यात वाद झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पिस्तूल राेखणारा मात्र पसार झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे यांनी मुज्जमिलला मध्यरात्रीतून अटक केली. न्यायालयाने त्याला १ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे शिंदे यांनी सांगितले.