कॉलेजमध्ये कॉलर उडवण्यावरून वाद; फ्लॅटमध्ये घुसून तरुणाचा चिरला गळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 11:41 IST2025-01-15T11:39:34+5:302025-01-15T11:41:34+5:30
छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक घटना; महाविद्यालयातील मारहाणीला तीन दिवसांनंतर गंभीर वळण

कॉलेजमध्ये कॉलर उडवण्यावरून वाद; फ्लॅटमध्ये घुसून तरुणाचा चिरला गळा
छत्रपती संभाजीनगर : शहरात शिक्षणासाठी आलेल्या १९ वर्षीय प्रदीप विश्वनाथ निपटे या विद्यार्थ्याची अज्ञातांनी निर्घृण हत्या केली. मित्र बाहेर गेलेले असताना मारेकऱ्यांनी त्याच्या फ्लॅटवर जात त्याला गळा चिरून मारून टाकले. मंगळवारी रात्री ११.३० वाजता उस्मानपुऱ्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
मूळ माजलगावचा असलेला प्रदीप देवगिरी महाविद्यालयात बीसीएसच्या प्रथम वर्षात शिकत होता. एक मावसभाऊ व अन्य तीन मित्र, असे सोबत भाजीवालीबाई पुतळ्याजवळील एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅटमध्ये किरायाने राहत होते. मंगळवारी महाविद्यालयातून सर्व जण परतले. सायंकाळी त्याचा भाऊ व अन्य मित्र बाहेर गेले होते. प्रदीप मात्र एकटाच फ्लॅटवर थांबला होता. रात्री १० वाजता ते खोलीवर परतले. तेव्हा प्रदीप गळा कापलेल्या रक्तबंबाळ मृतावस्थेतच दिसला. घटनेची माहिती मिळताच उस्मानपुऱ्याचे पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
मृतदेह पांघरुणाने झाकला
प्रदीप फ्लॅटवर एकटा आहे, याची पुरेशी माहिती घेऊन मारेकरी तेथे गेले असावेत. धारदार शस्त्राने गळ्यावर दोन वार करून जीव घेतला. त्यानंतर त्याला अंथरुणावर झोपलेल्या अवस्थेत ठेवून त्याच्या अंगावर पांघरूण टाकले. मित्र परत आल्यानंतर त्यांचे काही वेळ तिकडे लक्ष गेले नाही; पण अर्धातास उलटूनही प्रदीप उठत नसल्याने एकाने पांघरूण काढले आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
कॉलर उडवण्यावरून वाद
प्रदीपच्या हत्येला महाविद्यालयात झालेल्या वादाची पार्श्वभूमी असल्याचा प्राथमिक संशय आहे. शनिवारी महाविद्यालयातील मुलांची व प्रदीपच्या मित्रांची 'एकटक का पाहतो, तू कॉलर का उडवतो', अशा किरकोळ कारणांवरून वाद होऊन हाणामारी झाली होती. मध्यरात्रीतून पोलिसांनी महाविद्यालयातील काही तरुणांची माहिती घेऊन चौकशी सुरू केली होती.