लाडोबासाठी खरीदलेली खेळणी बीएसआय प्रमाणित आहेत का ?

By प्रशांत तेलवाडकर | Published: March 19, 2024 01:28 PM2024-03-19T13:28:36+5:302024-03-19T13:29:47+5:30

देशात बीएसआय व आयएसआय नसलेल्या खेळणी विक्रीवर बंदी आहे.

Are the toys purchased for kids BSI certified? | लाडोबासाठी खरीदलेली खेळणी बीएसआय प्रमाणित आहेत का ?

लाडोबासाठी खरीदलेली खेळणी बीएसआय प्रमाणित आहेत का ?

छत्रपती संभाजीनगर : तुमच्या लाडक्या मुला-मुलींसाठी दुकानातून खेळणी खरेदी करता. मात्र, त्या खेळणी बीएसआय प्रमाणित, आयएसआय मार्कच्या आहेत का, याची तपासणी केली का... नसेल तर यापुढे खेळणी खरेदी करताना सजग व्हा... कारण, देशात बीएसआय व आयएसआय नसलेल्या खेळणी विक्रीवर बंदी आहे.

बनावट खेळण्यांची विक्री होऊ नये म्हणून
निकृष्ट वस्तूंपासून बनविलेल्या खेळणींमुळे मुलांचे आरोग्य आणि सुरक्षिततेला धोका पोहोचू नये, बाजारात बनावट खेळण्यांची विक्री होऊ नये यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार १ जानेवारी २०२१ पासून भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व खेळण्यांवर भारतीय मानक ब्युरोचे (बीएसआय) सुरक्षिततेविषयक प्रमाणपत्र व इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट (आयएसआय) मार्क असणे बंधनकारक आहे. १४ वर्षांखालील मुला-मुलींसाठीच्या इलेक्ट्रिक आणि नॉन इलेक्ट्रिक खेळण्यांचा यात समावेश होतो.

बाजारात किती खेळण्यांवर आयएसआय मार्क
खेळणी व्यापाऱ्यांनी सांगितले की, शोरूममध्ये मिळणाऱ्या ९५ टक्के खेळण्यांवर बीएसआय प्रमाणित व आयएसआय मार्क आहेत. विक्री होणाऱ्यांपैकी ५ टक्के खेळणी अजूनही आयएसआय मार्क नाहीत. हातगाड्यांवर, रस्त्यांवर बिगर आयएसआय मार्क खेळणी सर्रास विक्री होतात.

किती ग्राहक सजग असतात?
खेळणी खरेदी करताना ४० टक्के ग्राहक हे सजग असतात. ते खेळणीच्या पॅकिंगवरील मार्क आहेत का ते बघतात व मगच खेळणी खरेदी करतात. मात्र, ६० टक्के ग्राहकांना या बदल माहितीच नसल्याचे व्यापाऱ्यांनी नमूद केले. मुलांना खेळणी आवडली की, ती खरेदी केली जाते. बीएसआय प्रमाणित आहे का ते बघितले जात नाही.

खेळणी बाजारावर मेड इन इंडियाचा दबदबा
पूर्वी भारतीय खेळणी बाजारपेठेवर ‘मेड इन चायना’ने मुसंडी मारली होती. जिकडे तिकडे चिनी खेळणी दिसत होत्या. मात्र, खेळणीवर बीएसआय प्रमाणित व आयएसआय मार्क असणे सक्तीचे करण्यात आले. आयात शुल्क वाढविण्यात आला आणि मागील तीन वर्षांत मोठा बदल घडून आला. खेळणी बाजारपेठेवर आता भारतीय खेळणी उद्योगाचा दबदबा निर्माण झाला आहे. खेळणीची आयात घटली व आता निर्यात वाढली आहे. भारतीय मोठ्या, लघु, मध्यम आणि कुटीर उद्योगाने दर्जेदार खेळणी तयार करून ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे.

मेड इन इंडिया खेळणी द्या
५ वर्षांआधी स्वस्तातील मेड इन चायना खेळणी द्या असे ग्राहक म्हणत होते. पण आता मानसिकता बदलली असून ‘मेड इन इंडिया’ खेळणी दाखवा, असे ग्राहक सांगत आहेत.
- सुमित मोटवाणी, खेळणी वितरक

Web Title: Are the toys purchased for kids BSI certified?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.