गरज नसतानाही कर्मचारी पाठवले, तेही अपात्र; 'रोहयो' विभागातील कंत्राटी भरती संशयास्पद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 18:06 IST2025-02-19T18:05:40+5:302025-02-19T18:06:20+5:30
छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात अशाच पध्दतीने कंत्राटी कर्मचारी भरती केल्याचा संशय बळावला आहे.

गरज नसतानाही कर्मचारी पाठवले, तेही अपात्र; 'रोहयो' विभागातील कंत्राटी भरती संशयास्पद
छत्रपती संभाजीनगर : रोहयो विभागात मागील काही वर्षांत कंत्राटी पद्धतीने केलेल्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या संशयास्पद असल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचे आदेश मुंबई लेखा परीक्षा विभागाचे प्रधान महालेखापालांनी रोहयो उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील २१६ कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची उलटतपासणी होणार आहे. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात अशाच पध्दतीने कंत्राटी कर्मचारी भरती केल्याचा संशय बळावला आहे.
२०२३ ते २०२४ या काळात राज्यात रोहयो विभागांत विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने ३ हजार कर्मचाऱ्यांच्या भरतीचे कंत्राट एका खासगी कंपनीला दिले होते. पात्रता नसताना आणि बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र सादर करून उमेदवारांना नियुक्ती दिल्याच्या तक्रारींचे पेव फुटल्यानंतर राज्यभर रोहयोच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी सुरू झाली. यात छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, पालघर, धाराशिव, अहिल्यानगर यांसह ज्या ठिकाणी दिलेल्या नियुक्त्या संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मार्च २०२४ पासून आतापर्यंत एस-२ या कंपनीने सहायक कार्यक्रम अधिकारी १०, तांत्रिक सहायक ३४, लिपीक-संगणक परिचालक ४६, शिपाई ३ अशी ९३ पदे भरली. प्रधान लेखापालांच्या आदेशानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी होणार आहे. २०१० पासून आजपर्यंत २१६ कंत्राटी कर्मचारी विभागात भरले. त्यांच्याही कागदपत्रांची तपासणी होणार आहे.
मंत्रालयातून येत आदेश...
कर्मचाऱ्यांची गरज नाही, असे वारंवार पत्र देऊनही पाठविलेले कर्मचारी रुजू करून घेण्याचे आदेश येत असत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाचा नाईलाज होत असे. अनेकांना दिलेले काम करता येत नाही, तरी त्यांना सांभाळले जात आहे. प्रशासनाने एक चालक व लिपिक अपात्र असल्याचे दिसताच त्यांना रूजू करून घेतले नाही.
आठवड्यात तपासणी पूर्ण होईल
प्रधान लेखापालांच्या पत्रानुसार जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होईल. नोटिसा देऊन कागदपत्र तपासणीसाठी हजर राहण्यास सांगितले जाईल. तपासणीला आठवड्याचा कालावधी लागेल. तपासणीचा अहवाल शासनाला पाठवू.
- उमाकांत पारधी, उपजिल्हाधिकारी, रोहयो