पुन्हा चुरस! शिंदेसेना, उद्धवसेना उतरणार मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 19:30 IST2025-10-27T19:27:43+5:302025-10-27T19:30:08+5:30
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना निवडणूक विभागाने जारी केली. तेव्हापासून सर्वच राजकीय पक्षांकडून पदवीधर मतदारसंघासाठी चाचपणी सुरू केली आहे.

पुन्हा चुरस! शिंदेसेना, उद्धवसेना उतरणार मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मैदानात
छत्रपती संभाजीनगर : आगामी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या मतदारसंघाच्या मैदानात महाविकास आघाडीचा घटक पक्ष उद्धवसेना आणि महायुतीचा घटक पक्ष असलेला शिंदेसेना हा पक्ष उतरणार असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही पक्षांनी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना निवडणूक विभागाने जारी केली. तेव्हापासून सर्वच राजकीय पक्षांकडून पदवीधर मतदारसंघासाठी चाचपणी सुरू केली आहे. पुढील वर्षी ही निवडणूक होणार आहे. असे असले तरी या मतदारसंघासाठी नव्याने मतदार नोंदणी करावी लागते. यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुकांकडून मतदार नोंदणीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. मागील पंधरा वर्षांपासून मराठवाडा पदवीधर मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमदेवार निवडून येत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट झाले आहेत. शिवाय दोन्ही गट परस्परविरोधी आघाडी आणि महायुतीचा घटक पक्ष आहेत. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला एक वर्ष बाकी असल्याने ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, अशी होईल अथवा नाही, याविषयी सांगता येत नाही. मात्र, महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अ.प.) मतदार नोंदणी सुरू केली आहे.
निवडणूक लढविण्यासाठी अनेकांची इच्छा
अशाच प्रकारे महायुतीतील शिंदेसेनेनेही मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी शहरात झाली. या बैठकीत पक्षाच्या नेत्यांनी युती होईल अथवा नाही, हे नंतर पाहू. पण, शिंदेसेनेला पदवीधर मतदारसंघाची ताकद दाखवायची असल्याचे सांगितले. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मतदार नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले. उद्धवसेनेच्या युवासेना आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्याही याविषयावर सतत बैठका होत आहेत. पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी पक्षाकडे अनेकांनी इच्छा व्यक्त केल्याची चर्चा आहे. पक्षप्रमुखांनीही तयारीला लागा, असे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले.