शिवाजीनगर भुयारी मार्गात पुन्हा अपघात! दोन दुचाकीस्वार खासगी बसखाली आले, सुदैवाने बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 11:51 IST2025-11-04T11:51:38+5:302025-11-04T11:51:56+5:30
अपघातामुळे तासभर वाहतूक खोळंबली, शेकडो नागरिकांना मनस्ताप

शिवाजीनगर भुयारी मार्गात पुन्हा अपघात! दोन दुचाकीस्वार खासगी बसखाली आले, सुदैवाने बचावले
छत्रपती संभाजीनगर : कर्कश हॉर्न, साचलेले घाण पाणी व गाळ, चिखलातून शिवाजीनगर भुयारी मार्गातून मार्ग काढत असतानाच दोन दुचाकीस्वार एका खासगी बसच्या धडकेत किरकोळ जखमी झाले. सोमवारी रात्री ८ वाजता घडलेल्या या अपघातानंतर तासभर वाहतूक खोळंबल्याने नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
लोकार्पणापासून शिवाजीनगर भुयारी मार्ग नागरिकांसाठी डोकेदुखी बनला आहे. सातत्याने साचणारे घाण पाणी, देवळाई व शिवाजीनगर चौकात खोळंबणारी वाहतूक व रस्त्यावर पाण्यामुळे साचणाऱ्या गाळातून मार्ग काढताना नागरिकांची चांगलीच दमछाक होत आहे. याच गाळामुळे एका दुचाकीस्वाराचा घसरून डोक्यावर पडल्याने मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही सातत्याने भुयारी मार्गात अपघात होत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ८ वाजता एक मोपेडस्वार महिला व दुचाकीचालक तरुण देवळाई चौकातून शिवाजीनगरच्या दिशेने जात होते. त्याच वेळी त्यांच्या मागून कामगारांची वाहतूक करणारा बसचालक वेगात गर्दीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होता. त्यातच त्याने सदर महिला व तरुणाला जोरात धडक दिली. यात दोघेही किरकोळ जखमी झाले. मात्र, दुचाकींचे मोठे नुकसान झाले.
तासभर खोळंबला भुयारी मार्ग
या अपघातानंतर एकच हल्लकल्लोळ उडाला. बस अडकल्याने जवळपास तासभर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिस, पुंडलिकनगर पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. या घटनेनंतर अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला.