पशुपालकांनो काळजी घ्या; सोयगावात ‘लम्पी’चा शिरकाव, ७ जनावरांना लागण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 17:25 IST2025-07-18T17:18:15+5:302025-07-18T17:25:01+5:30
सोयगावसह तालुक्यातील जरंडी, माळेगाव, पिंपरी या गावांत ७ जनावरांना लम्पी या त्वचारोगाची लागण झाली आहे.

पशुपालकांनो काळजी घ्या; सोयगावात ‘लम्पी’चा शिरकाव, ७ जनावरांना लागण
सोयगाव : सोयगावसह परिसरातील विविध गावांमध्ये पुन्हा एकदा जनावरांना लम्पी या त्वचारोगाची लागण झाल्याने पशुपालक अस्वस्थ झाले आहेत.
सोयगावसह तालुक्यातील जरंडी, माळेगाव, पिंपरी या गावांत ७ जनावरांना लम्पी या त्वचारोगाची लागण झाली आहे. डोळे व नाकातून पाणी येणे, लसिका ग्रंथींची सूज, दूध उत्पादनात घट, पाय सुजणे व लंगडणे, तोंड, डोळे व नाकाभोवती व्रण, चारा-पाणी घेण्याची इच्छा कमी होणे आदी लक्षणे या जनावरांना दिसत आहेत.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर पशुसंवर्धन विभाग खडबडून जागा झाला असून त्यांच्याकडून याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. मागील वर्षी तालुक्यात लम्पीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता. त्या पार्श्वभूमीवर ६५० हून अधिक गुरांचे लसीकरण करण्यात आले होते. या लसीकरणामुळे बहुतांश गुरे सुरक्षित राहिली होती. यंदाही तातडीने लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे.