छ. संभाजीनगर मनपा स्थायी समितीच्या चाव्या अनिल मकरीयेंकडे; निवडणुकीत दणदणीत विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 17:50 IST2026-03-12T17:47:11+5:302026-03-12T17:50:48+5:30
विकासाचा निर्धार! छत्रपती संभाजीनगराचे आर्थिक नियोजन आता अनिल मकरीये यांच्या हाती.

छ. संभाजीनगर मनपा स्थायी समितीच्या चाव्या अनिल मकरीयेंकडे; निवडणुकीत दणदणीत विजय
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल मकरीये यांची निवड झाली आहे. शहराचे नामकरण झाल्यानंतरचे ते 'पहिले' स्थायी समिती सभापती ठरले आहेत. गुरुवारी झालेल्या निवडणुकीत त्यांनी १० मते मिळवत एमआयएमच्या उमेदवाराचा पराभव केला.
१६ सदस्यीय स्थायी समितीत भाजप आणि शिंदेसेनेचे बहुमत असल्याने मकरीये यांची निवड निश्चित मानली जात होती. प्रत्यक्ष मतदानात मकरीये यांना १० मते मिळाली, तर एमआयएमचे उमेदवार खान अब्दुल मतीन यांना केवळ ४ मते पडली. महाविकास आघाडीच्या इतर सदस्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते, मात्र मकरीये यांनी स्पष्ट बहुमताने विजय मिळवला.
अनिल मकरीये हे राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्या निवडीमुळे भाजपचा महानगरपालिकेवरील आणि शहरावरील प्रभाव अधिक गडद झाला आहे. यावेळी महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पारदर्शक आर्थिक नियोजनाचा निर्धार
निवडीनंतर बोलताना अनिल मकरीये म्हणाले, "शहराचे छत्रपती संभाजीनगर नामकरण झाल्यानंतर पहिला सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळणे हा माझा बहुमान आहे. शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेले आर्थिक नियोजन आम्ही पारदर्शकतेने करू. स्मार्ट शहर म्हणून हे शहर जगात ओळखले जाईल, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
स्थायी समितीत पक्षीय बलालब
भाजप- कमलाबाई नरोटे, राजगौरव वानखेडे, सुरेंद्र कुलकर्णी, रवी कावडे, अनिल मकरिये, अर्चना नीळकंट, माधुरी अदवंत, अप्पासाहेब हिवाळे
एमआयएम - खान अब्दुल मतीन, मेराज खान, पठाण मजहर, खान अल्मास खानम
शिंदेसेना- श्वेता त्रिवेदी, राजू राजपूत
उद्धवसेना- सचिन खैरे
वंचित - अमित भुईगळ