सद्यस्थितीला ‘अँग्री यंगमॅन’ उत्तर नाही, समूह भावनेने समस्येवर काम करणे गरजेचे: तिग्मांशू धुलिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 17:36 IST2025-01-17T17:35:27+5:302025-01-17T17:36:04+5:30
अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांचा ‘मास्टर क्लास’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सद्यस्थितीला ‘अँग्री यंगमॅन’ उत्तर नाही, समूह भावनेने समस्येवर काम करणे गरजेचे: तिग्मांशू धुलिया
छत्रपती संभाजीनगर : व्यवस्थेविरुद्ध लढण्याची सामूहिक आणि संघटनात्मक भावना आज दिसत नाही. सगळे लोक छोट्या, छोट्या गटांमध्ये विभागले गेले असल्यामुळे समकालीन काळामध्ये एखाद्या व्यक्तीची समस्या ही समाजाची किंवा इतर व्यक्तीची समस्या असल्याची भावना निर्माण होताना दिसत नाही. त्यामुळे सध्याच्या स्थितीला ‘अँग्री यंगमॅन’ हे उत्तर नसून समूह भावनेने समस्येवर काम करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन दिग्दर्शक व अभिनेता तिग्मांशू धुलिया यांनी यावेळी केले.
प्रोझोन मॉल येथील ‘आयनॉक्स’ थियेटरमध्ये अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पानसिंग तोमर चित्रपटाचे दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांच्याशी गुरुवारी दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग यांनी संवाद साधला. यावेळी धुलिया म्हणाले की, गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम असणारे प्रयागराज हे शहर असून देशभरातील सर्व भागांतून असंख्य लोक येथे आज आलेले आहेत. माझ्या जडणघडणीत या शहराचे महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले आहे. या शहरातून स्वातंत्र्य आणि काही तरी प्रतिभा संपन्नतेच्या शोधात मी बाहेर पडलो. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे मी भेट दिली. वयाच्या १९ व्या वर्षी एनएसडीमध्ये दाखल झालो. लहानणापासूनच ॲक्शन चित्रपट आवडत होते, असे दिग्दर्शक तिग्मांशू यांनी सांगितले.
अभिनयात नेहमी सुधारणेला वाव
चित्रपट सृष्टीमध्ये सगळ्यांचा संघर्ष वेगवेगळा असतो, यामध्ये तुलना होऊ शकत नाही. मला अभिनेता आणि दिग्दर्शक याच्यामध्ये दिग्दर्शन करणे आवडते, केवळ पैसे मिळतात म्हणून मी अभिनय करतो. सगळ्यात सोपे काम अभिनय करण्याचे असून अभिनय हा कधीही परिपूर्ण असत नसून त्यात नेहमी सुधारणेला वाव असल्याचे तिग्मांशू धुलिया यांनी यावेळी सांगितले.