रस्त्यावरील खड्ड्यांची तक्रार केल्याचा राग, मनसे पदाधिकाऱ्यांना करोडी टोलनाक्यावर मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 18:05 IST2025-08-08T17:59:41+5:302025-08-08T18:05:01+5:30
'आम्ही टोल भरतो, रस्त्यावर पथदिवे नाही, खड्डे पडलेत' असे म्हणत तक्रार नोंदवण्यासाठी तक्रार बुक मागितले.

रस्त्यावरील खड्ड्यांची तक्रार केल्याचा राग, मनसे पदाधिकाऱ्यांना करोडी टोलनाक्यावर मारहाण
छत्रपती संभाजीनगर : रस्त्यावरील खड्डे, पथदिव्यांबाबत तक्रार करण्यासाठी रजिस्टर मागितल्याच्या कारणावरून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री तीन वाजता करोडी टोलनाक्यावर ही घटना घडली.
मनसेचे उपजिल्हाध्यक्ष तथा ठेकेदार संकेत शेटे, महानगर अध्यक्ष बिपिन नाईक व मनीष जोगदंडे हे कारने समृद्धी महामार्गावरून फातियाबाद येथे उरतले. तेथून पुढे सोलापूर-धुळे महामार्गावरून करोडी टोलनाक्यापर्यंत पोहोचले. तेथे फास्टॅगद्वारे टोलचे शुल्क कपात झाले. मात्र, शेटे यांनी तेथील कर्मचाऱ्यांना 'आम्ही टोल भरतो, रस्त्यावर पथदिवे नाही, खड्डे पडलेत' असे म्हणत तक्रार नोंदवण्यासाठी तक्रार बुक मागितले. कर्मचाऱ्याने त्यांना कार बाजूला उभी करून वर येण्यास सांगितले. शेटे व त्यांचे सहकारी कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर जाताच प्रभू बागुल नामक व्यक्तीसह इतरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. लाकडी दांड्याने वार करून जखमी करत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. तेथून शेटे यांनी रुग्णालयात उपचार घेऊन दौलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून बागूल व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
टोलनाक्याला वादाची पार्श्वभूमी
याच करोडी टोलनाक्यावर मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. जून २०२४ मध्ये फास्टॅगच्या वादातून टोलवरील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना बेदम मारहाण करत जखमी केले होते. एका भाजप पदाधिकाऱ्यालादेखील मध्यरात्री याच परिसरात टोलच्या वादातून मारहाण झाली होती.