ऋणानुबंध जुळले, आता जावं लागतंय; मावळते कुलगुरू प्रमोद येवलेंच्या डोळ्यात तरळले अश्रू

By राम शिनगारे | Published: January 2, 2024 03:58 PM2024-01-02T15:58:27+5:302024-01-02T16:04:09+5:30

सुरेश गोसावी यांनी प्रभारी कुलगुरू म्हणून सूत्रे स्वीकारली

...and tears welled up in the eyes of vice-chancellor Pramod Yevle on his last day at BAMU | ऋणानुबंध जुळले, आता जावं लागतंय; मावळते कुलगुरू प्रमोद येवलेंच्या डोळ्यात तरळले अश्रू

ऋणानुबंध जुळले, आता जावं लागतंय; मावळते कुलगुरू प्रमोद येवलेंच्या डोळ्यात तरळले अश्रू

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा साडेचार वर्षे कारभार सांभाळून निवृत्त झालेले कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे प्रभारी कुलगुरूपदाची सूत्रे सोमवारी (दि.१) सोपवली. त्यानंतर स्वत:च्या गाडीत बसताना डॉ. येवले यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. या काळात जुळलेले ऋणानुबंध आठवल्याने त्यांचा कंठ दाटला होता. त्यांना गाडीपर्यंत सोडण्यासाठी मुख्य इमारतीमधील सर्व अधिकारी आले होते.

राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी २६ डिसेंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती केली होती. मावळते कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा ३१ डिसेंबर रोजी कार्यकाळ पूर्ण झाला. त्यानुसार डॉ. येवले यांनी साेमवारी सकाळी ११ वाजता कुलगुरूपदाचा मानदंड डॉ. गोसावी यांच्याकडे सुपूर्द केला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवासस्थानी जाण्यासाठी डॉ. येवले यांनी विद्यापीाठाच्या वाहनाऐवजी स्वत:चे वाहन मुख्य इमारतीसमोर उभे केलेले होते. गाडीत बसताना त्यांचा कंठ दाटून आला. त्यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारीसुद्धा भावुक झाले. गाडी सुरू झाल्यानंतर डॉ. येवलेंच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचेही दिसले.

दरम्यान, प्रभारी कुलगुरू डॉ. गोसावी यांनी पदभार घेण्यापूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या पुतळ्यास, यशवंतराव चव्हाण यांच्या तैलचित्रास अभिवादन केले. यावेळी कुलसचिव दिलीप भरड, वित्त व लेखाधिकारी सविता जंपावाड, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. भगवान साखळे, अधिसभा सदस्य डॉ. भास्कर साठे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. कैलास अंभुरे यांच्यासह अधिकारी, प्राध्यापक उपस्थित होते. अधिकारी, विभागप्रमुखांशी संवाद प्रभारी कुलगुरू डॉ. गोसावी यांनी अधिकारी व विभागप्रमुखांशी संवाद साधला. प्रशासकीय विभागाची सद्य:स्थिती तसेच आगामी काळातील नियोजन याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: ...and tears welled up in the eyes of vice-chancellor Pramod Yevle on his last day at BAMU

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.