कंदुरीच्या कार्यक्रमात जुना जुगाराचा वाद उफाळला; आधी पित्यास मारहाण, नंतर मुलाला संपविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 14:26 IST2022-07-21T14:13:50+5:302022-07-21T14:26:58+5:30
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वादाची कुरापत काढून मारहाण केली.

कंदुरीच्या कार्यक्रमात जुना जुगाराचा वाद उफाळला; आधी पित्यास मारहाण, नंतर मुलाला संपविले
गेवराई (जि. बीड) : घरी आयोजित केलेल्या कंदुरी कार्यक्रमासाठी बोलावलेल्या भावकीतील लोकांनी जुगार खेळण्यावरून झालेल्या जुन्या वादाची कुरापत काढून आधी पित्यास मारहाण केली, त्यानंतर मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून संपविले. ही थरारक घटना शहरातील संजयनगरात २० जुलै रोजी सायंकाळी घडली.
बाबू शिवराम शेनुरे (वय २५, रा. संजयनगर, गेवराई) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो फिरून भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करत होता. २० जुलै रोजी बाबू शेनुरे याच्या घरी कंदुरीचा कार्यक्रम होता. यासाठी पाहुणे व भावकीतील लोकांना त्याने आमंत्रण दिले होते. कार्यक्रम आटोपल्यावर सर्व नातेवाईक गेले. मात्र, अंबादास व्यंकट शेनुरे (रा. पाचोड, जि. औरंगाबाद, हमु. संजयनगर, गेवराई), लालू व्यंकट शेनुरे व अशोक व्यंकट शेनुरे (दोघे रा. पाचोड, जि. औरंगाबाद) हे तिघे तेथेच थांबले. सायंकाळी पाच वाजेनंतर बाबू शेनुरे हा घरात झोपी गेला.
यावेळी तीन भावंडांनी आधी बाबू याचे वडील शिवराम यांना मारहाण केली. त्यानंतर बाबू यास झोपेतून जागे करून पत्ते खेळण्यातून दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वादाची कुरापत काढून मारहाण केली. लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत तोल गेल्याने बाबू घरासमोरील नालीत पडला. त्यानंतर तिघेही पळून गेले. कुटुंबीयांनी त्यास उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले. माहिती मिळताच गेवराई ठाण्याचे निरीक्षक रवींद्र पेरगुलवार, सहायक निरीक्षक संदीप काळे, संतोष जंजाळ, सहायक उपनिरीक्षक सुरेश पारधी, अंमलदार शेखर हिंगावार, किरण पोद्दार यांनी घटनास्थळी धाव घेतली.
आरोपींच्या मागावर पथके,नातेवाईकांनी शवविच्छेदन रोखले
दरम्यान, या घटनेनंतर आरोपींनी पाचोडच्या दिशेने पलायन केल्याचा अंदाज आहे. त्यांच्या मागावर दोन पथके रवाना केली आहेत. नातेवाइकांच्या फिर्यादीनंतर गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई केली जाईल. आरोपींना लवकरच जेरबंद करण्यात येईल, अशी माहिती पोनि. रवींद्र पेरगुलवार यांनी दिली. आज सकाळी आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी मृताच्या नातेवाईकांनी शवविच्छेदन रोखले असुन नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालया समोर गर्दी केली आहे.