जुन्या ओळखीने घात केला! बीडच्या महिलेचा छत्रपती संभाजीनगरात खून, तीन महिन्यांनी उकल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 17:11 IST2025-01-28T17:11:11+5:302025-01-28T17:11:54+5:30
पांढऱ्या मण्यांची माळ अन् अंगठीने तपासाला सुरुवात, वेरूळ घाटात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाची झाली उकल, आरोपी अटकेत

जुन्या ओळखीने घात केला! बीडच्या महिलेचा छत्रपती संभाजीनगरात खून, तीन महिन्यांनी उकल
खुलताबाद (छत्रपती संभाजीनगर): वेरूळ घाटात सापडलेल्या अनोळखी महिलेच्या मृत्यूचे गूढ उकलले असून, तीचा खून झाल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी खुलताबाद पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपींना अटक करून प्रकरणाची उकल केली आहे. तीन महिन्यांपूर्वी वेरूळ घाटात महिलेच्या कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहावरील पांढऱ्या मण्यांची माळ अन् तीन धातूंच्या अंगठीने तपासाला सुरुवात करून पोलिसांनी बीड येथील महिलेची छत्रपती संभाजीनगरातील दोघांनी हत्या केल्याचे क्लिष्ट तपासातून उघड केले.
वेरूळ घाटातील वळणाजवळ दरीत १० नोव्हेंबर २०२४ रोजी एका स्त्रीचा कुजलेला मृतदेह सापडला होता. मृतदेह पूर्णतः कुजल्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले होते. घटनास्थळी सापडलेल्या पांढऱ्या मण्यांच्या माळेसह हातात असलेल्या तीन धातूच्या अंगठ्या यावरून तपासाला सुरुवात करण्यात आली. शवविच्छेदनादरम्यान मृतदेहाच्या हाडाचा नमुना डीएनए तपासणीसाठी राखून ठेवण्यात आला होता.
दरम्यान, जवळपास एक महिन्याने ४ डिसेंबर २०२४ रोजी बीड शहरातील शांताबाई भारत धामुने (वय ६५ वर्षे) या ३ ऑक्टोबरपासून बेपत्ता असल्याची नोंद पोलीस ठाणे पेठ, बीड येथे असल्याची माहिती मिळाली. खुलताबाद पोलिसांनी मृतदेहाजवळ सापडलेल्या अंगठ्या आणि माळ तिच्या कुटुंबीयांना दाखवल्या. तिची मुलगी रत्नमाला शशिकांत सुते हिने अंगठ्या आणि माळ तिच्या आईची असल्याचा संशय व्यक्त केला. डीएनए नमुन्याद्वारे मृतदेह हा शांताबाई धामुने यांचा असल्याचे २३ जानेवारी २०२५ रोजी प्राप्त झालेल्या अहवालातून निष्पन्न झाले.
जुन्या ओळखीने घात केला
शांताबाई धामुने यांच्या फोन कॉलची तपासणी केली असता ३ ऑक्टोबर २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील पडेगाव परिसरातील जावेद खान नुर खान याच्याशी वारंवार संपर्क झाल्याचे निष्पन्न झाले. त्या रात्री ९:३० वाजता पडेगाव येथे पोहोचल्या होत्या आणि त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या. संशयावरून पोलिसांनी जावेद खानला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीदरम्यान, जावेद खानने सांगितले की, तो पडेगाव येथे प्लॉट खरेदी-विक्री एजंट म्हणून काम करतो. शांताबाई धामुने यांची त्याच्याशी ओळख होती. त्या प्लॉट खरेदीसाठी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी त्याच्याकडे रोख रक्कम घेऊन आल्या होत्या. पैशाच्या लालसेने त्याने त्याच्या सावत्र भावासह त्यांना गुंगीचे औषध दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी ४ ऑक्टोबर रोजी वेरूळ घाटात नेऊन धारदार शस्त्राने गळा कापून त्यांचा खून केला आणि मृतदेह दरीत फेकून दिला.
पोलिसांच्या सातत्यपूर्ण तपासाला यश
या प्रकरणी जावेद खान नुर खान आणि नदीम खान नुर खान या दोघांना २७ जानेवारी २०२५ रोजी रात्री अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता १ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सुमारे तीन महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेत सुरुवातीला एक महिना तर ओळख उघडकीस होण्यासच लागले. त्यानंतरही पोलिसांनी तपासात सातत्य ठेवत आरोपींना अटक केली. पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, सपोनि दिनकर गोरे, नवनाथ कोल्हे, योगेश्वर ताठे, किशोर गवळी, जाकेर शेख, सिद्धार्थ सदावर्ते, सोनाली कुंदे यांनी तपास यशस्वीपणे पूर्ण केला.