Chhatrapati Sambhajinagar Crime: गांजाच्या नशेत रस्त्यावर झाला वाद, मग मैदानावर नेत जिवलग मित्रानेच चिरला तरुणाचा गळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 14:08 IST2025-10-16T14:06:50+5:302025-10-16T14:08:23+5:30
मारेकऱ्याला पहाटे घरातून अटक; जानेवारीत हत्येचा प्रयत्न करून जिन्सीतच वास्तव्य, तरी पोलिसांना नाही सापडला

Chhatrapati Sambhajinagar Crime: गांजाच्या नशेत रस्त्यावर झाला वाद, मग मैदानावर नेत जिवलग मित्रानेच चिरला तरुणाचा गळा
छत्रपती संभाजीनगर : एसएफएस शाळेच्या मैदानावर सुरेश भगवान उंबरकर (३०, रा. कैलासनगर) या तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. मंगळवारी रात्री ११.३० वाजता उघडकीस आलेल्या या घटनेत जिवलग मित्र सचिन उर्फ जंगली मच्छिंद्र जाधव (२४, रा. जुना बायजीपुरा) यानेच त्याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखेच्या पथकाने सचिनचा शोध घेत बुधवारी पहाटे काली बावडी परिसरातून त्यास अटक केली.
सुरेश गारखेड्यातील स्वयंपाकी होता. सध्या तो एका अंडाभुर्जीच्या गाडीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. जालना रोडवरील एसएफएस शाळेच्या मागील मैदानावर कायमच अंधार असतो. त्यामुळे येथे नेहमीच नशेखोरांच्या बैठका रंगतात. मंगळवारी रात्री अशाच काही नशेखोरांना एका खड्ड्यात तरुणाला मारहाण होत असल्याचे दिसले. त्यांनी तिकडे धाव घेईपर्यंत सुरेश गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती कळताच जवाहरनगरचे पोलिस निरीक्षक सचिन कुंभार, गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार, सहायक निरीक्षक विनायक शेळके, उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तत्काळ तपासाची चक्रे फिरवली.
पहिले रस्त्यावर झाला वाद, मग मैदानावर नेत चिरला गळा
हत्येनंतर सचिनला पळून जाताना काहींनी पाहिले होते. मैदानावर जाण्यापूर्वी सचिन व सुरेशचे जालना रोडवरच जोरजोरात भांडण झाले होते. हे अनेकांनी पाहिले होते. त्यातील काहींनी सचिनला ओळखले होते. त्यामुळे उपनिरीक्षक प्रवीण वाघ, अंमलदार नवनाथ खांडेकर, संदीप तायडे, संजय गावंडे, सुनील जाधव, योगेश नवसारे, सोमकांत भालेराव, राजेश यदमळ यांनी सचिनचा शोध सुरू केला. पहाटे तो काली बावडी परिसरात नशा करत असल्याचे कळताच पथकाने धाव घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. गांजा पिताना उफाळून आलेल्या जुन्या वादातून हत्या केल्याचे त्याने कबूल केले.
हत्येचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात आरोपी, तरी राजरोस फिरत होता
सचिनवर जानेवारी २०२५ मध्ये जवाहरनगर पोलिस ठाण्यातच एकावर प्राणघातक हल्ला करून हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यात तो पसार दाखवण्यात आला. प्रत्यक्षात तो दररोज राजरोस जिन्सी, हेडगेवार रुग्णालय परिसरात फिरत होता, तरीही सदर गुन्ह्याच्या तपास अधिकाऱ्याला तो मिळून कसा आला नाही, असा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.