छत्रपती संभाजीनगरात साडेसात हजार आक्षेपांनंतर मतदार याद्यांमध्ये सुधारणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 16:11 IST2025-12-11T16:11:22+5:302025-12-11T16:11:44+5:30
याद्यांमधील नेमके बदल कोणते, याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली जाईल.

छत्रपती संभाजीनगरात साडेसात हजार आक्षेपांनंतर मतदार याद्यांमध्ये सुधारणा
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्यांवर ७ हजार ५६७ आक्षेप दाखल झाले होते. या आक्षेपांनुसार मतदार याद्यांमध्ये सुधारणा करून ते महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे सादर करण्याचे काम प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून सुरू होते. याद्यांमधील नेमके बदल कोणते, याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली जाईल. त्यांच्या मान्यतेनंतर यादी अंतिम केली जाणार असल्याचे निवडणूक विभागातील सूत्रांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीसाठी २९ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. प्रभागनिहाय मतदार यादीही तयार केली. याद्या प्रसिद्ध होताच इच्छुकांसह सर्वसामान्यांमध्ये एकच खळबळ उडाली. याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे समोर आले. एका प्रभागातील हजारो मतदार दुसऱ्या प्रभागात दर्शविण्यात आले. आता हे मतदार शोधण्याचे काम इच्छुक उमेदवारांसह सर्वसामान्य नागरिकांना करावे लागले. याद्यांची शहानिशा करण्यासाठी स्वत: प्रशासक जी. श्रीकांत यांना रस्त्यावर उतरावे लागले. काही प्रभागांत जाऊन त्यांनी मतदारांचे म्हणणे एकूण घेतले. अधिकाऱ्यांना फेरबदल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर उपायुक्त विकास नवाळे, अपर्णा थेटे यांच्यासह अन्य काही वरिष्ठ अधिकारीही विविध प्रभागांत पाहणी करीत होते. चुकून जे मतदार दुसऱ्या प्रभागात गेले, त्यांना परत संबंधित प्रभागात आणण्याचे काम करण्यात आले. काही मतदार महापालिका हद्दीच्या बाहेर असल्याचे निदर्शनास आले होते. त्यांनाही बाजूला करण्यात आले. फेरबदल होत असलेल्या याद्यांची माहिती नियुक्त प्राधिकृत अधिकारी निवडणूक विभागाकडे सादर करीत आहेत. ‘कंट्रोल चार्ट’ असेही त्याला म्हटले जाते. हे सर्व चार्ट प्राप्त होताच ते राज्य निवडणूक आयोगाकडे अपलोड केले जातील, त्यांच्या आदेशानुसार पुढील यादी अंतिम केली जाईल, असेही सूत्रांनी सांगितले.
१५ रोजी यादी प्रसिद्ध होणार
राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी मतदार याद्यांचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार आता १५ डिसेंबर रोजी यादी अंतिम करून जाहीर केली जाईल.