बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या संचिकेवर अधिकाऱ्यांचा नकारात्मक शेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 20:12 IST2020-03-11T20:07:01+5:302020-03-11T20:12:04+5:30
महापौर नंदकुमार घोडेले यांनी लेखा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून संचिका मागवली.

बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या संचिकेवर अधिकाऱ्यांचा नकारात्मक शेरा
औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक मनपाकडून उभारण्यात येणार आहे. स्मारकाच्या फाईलवर अधिकाऱ्यांनी नकारात्मक शेरा मारला आहे. त्यामुळे ही फाईल स्थायी समितीच्या सभागृहात आणून दाखवावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवकांनी आज केली. लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांनी फाईल दाखविण्यास नकार दिला.
सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीदरम्यान उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी ठाकरे स्मारकाच्या कामाची संचिका लेखा विभागात का प्रलंबित ठेवली आहे, नेमका कोणता शेरा मारून ही संचिका बाजूला केली आहे, असा प्रश्न केला. ही संचिका सभागृहात मागवून प्रशासनाकडून खुलासा घ्यावा, अशी मागणी जंजाळ यांनी सभापतींकडे केली. त्यावर खुलासा करताना लेखाधिकारी संजय पवार यांनी आयुक्तांकडून संचिका आपल्याकडे आली असून संचिका मंजूर करून पुढे पाठविल्याचे सांगितले. त्या संचिकेवर नेमका काय शेरा मारला आहे याविषयी सांगा, असा प्रश्न जंजाळ यांनी केला. ठाकरे स्मारकाचा भावनिक मुद्दा आहे, या कामात अशी दिरंगाई का केली जात आहे, ती संचिका सभागृहात आणून आम्हाला दाखवा, अशी मागणी जंजाळ यांनी केली. त्यावर पवार यांनी, सभा कामकाज नियमावली अनुसूचित-ड प्रमाणे विषयपत्रिकेत असलेल्या विषयांवर अधिकारी खुलासा करू शकतात. नियमाने विषयपत्रिकेवर नसलेल्या विषयासंबंधी आयुक्तांच्या परवानगीशिवाय मी खुलासा करू शकत नाही, संचिका दाखवू शकत नाही, असे सांगितले. संचिका येईपर्यंत बैठक तहकूब करावी, अशी मागणी जंजाळ यांनी केली. सभापती कुलकर्णी यांनी बैठक तहकूब केली.
संचिकेत नेमके काय दडले आहे?
लेखा विभागाने दाबून ठेवलेली संचिका ही ठाकरे स्मारकाच्या कामाची नाही, तर या स्मारकाच्या कामाचा डीपीआर तयार करणाऱ्या प्रकल्प सल्लागार कंपनीचे बिल अदा करण्याची आहे. अद्याप स्मारकाच्या कामाची निविदाही नाही. ४शासनाकडून निधीही मिळालेला नाही. त्याआधीच प्रकल्प सल्लागार कंपनीचे बिल काढण्याची संचिका लेखा विभागात दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
सेना नगरसेवक महापौर दालनात
महापौर नंदकुमार घोडेले यांनी लेखा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून संचिका मागवली. मात्र, लेखा विभागात संचिका नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यावर उपअभियंता परदेशी यांना विचारणा केली. तेव्हा संचिका लेखा विभागातच असल्याने त्यांनी सांगितले. नियमानुसार आयुक्तांना पत्र पाठवून संचिका मागविण्यात येईल, असे महापौरांनी नमूद केले.