छत्रपती संभाजीनगर छावणी परिसरातील ‘आंबेडकर निवासस्थान’ होणार ज्ञान, संशोधन केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 12:54 IST2025-11-12T12:53:02+5:302025-11-12T12:54:34+5:30
ऋषिकेश कांबळेंसह शिष्टमंडळाला नितीन गडकरींचे अभिवचन

छत्रपती संभाजीनगर छावणी परिसरातील ‘आंबेडकर निवासस्थान’ होणार ज्ञान, संशोधन केंद्र
छत्रपती संभाजीनगर : छावणी भागातील बंगला क्रमांक ७, ८, ९ आणि १० येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यातील तब्बल नऊ वर्षांचा कालावधी घालविला. या ऐतिहासिक ३२ एकर जागेवर भव्य स्मृती व संशोधन प्रकल्प उभारण्याचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर असून, हा प्रकल्प तडीस नेण्याचे अभिवचन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच दिले असल्याची माहिती समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी दिली.
या ३२ एकर जागेवर ५ मजली आंतरराष्ट्रीय पातळीवरचे ग्रंथालय, कृषी संशोधनासह मानव विद्या व्यवस्थापन शास्त्र, पुरातत्त्व, भूगर्भशास्त्र अशा विविध अंगी संशोधनाचे आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, किमान ५० संशोधकांची भोजन व निवासव्यवस्था, राष्ट्रपती भावनासमोरील बागेप्रमाणे आकर्षक बाग, दीक्षाभूमीवरील सम्राट अशोककालीन शिल्प नमुना, भव्य सभागृह उभारावे, अशी भूमिका डॉ. कांबळे यांच्यासह प्रा. मनोहर लोंढे, विजय निकाळजे आणि विल्सन गायकवाड यांच्या शिष्टमंडळाने लावून धरलेली होती. गेल्या आठ वर्षांपासून या प्रकल्पांच्या परिपूर्तीसाठी ही मंडळी प्रयत्नशील आहे.
यासंदर्भात केंद्रीय अल्पसंख्याक आणि कायदेमंत्री किरण रिजुजी यांनी या जागेची पाहणी करून अंदाजे अडीचशे कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करायला सांगितले होते. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष लक्ष घातले आहे. त्याबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी अलीकडे डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मंत्री गडकरी यांची नागपुरात भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हा प्रकल्प पूर्ण करण्याचे अभिवचन दिले.