आधीच जलसंपदाची ७५ टक्के पदे रिक्त, कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी निम्मे संपावर
By बापू सोळुंके | Updated: March 18, 2023 15:32 IST2023-03-18T15:32:16+5:302023-03-18T15:32:48+5:30
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे.

आधीच जलसंपदाची ७५ टक्के पदे रिक्त, कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी निम्मे संपावर
छत्रपती संभाजीनगर : आधीच जलसंपदा विभागात मंजूर अधिकारी, कर्मचाऱ्यांची सुमारे ७५ टक्के पदे रिक्त आहेत. उर्वरित कर्मचाऱ्यांपैकी निम्मेअधिक अर्थात ३३ कर्मचारी संपावर असल्याने साधे टपाल घेण्याचे कामही कार्यालयीन प्रमुख असलेल्या कार्यकारी अभियंत्याला करावे लागले.
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात जलसंपदा विभागातील वर्ग ३ आणि ४ चे कर्मचारी सहभागी झाले आहेत. जलसंपदा विभागाच्या सिंचन भवन येथील कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे यांच्या कार्यालयांतर्गत असलेल्या विविध उपविभाग आणि शाखा कार्यालयासाठी १५९ पदे मंजूर आहेत. यापैकी केवळ ६९ अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. उर्वरित पदे रिक्त आहेत. आधीच रिक्त पदांमुळे तेथील कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त बोजा आहे. यातच जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी ३३ कर्मचारी संपात सहभागी झाले. याचा फटका कार्यालयीन कामकाजावर झाला. टपाल घेण्यासाठी आणि आवक, जावक विभागातील कारकून संपावर असल्याने कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे यांनी स्वत: हा टेबल सांभाळत बाहेरून आलेले टपाल घेऊन, टपाल कारकून म्हणून स्वाक्षरी केली. यानंतर त्यांनी संपात सहभागी कर्मचाऱ्यांचा अहवाल वरिष्ठांना पाठविला.
शेतकऱ्यांना फटका
पाणी वापर परवानगी मिळावी, यासाठी आलेल्या शिवना टाकळी येथून आलेल्या शेतकऱ्याला संप सुरू आहे, असे सांगून परत पाठविण्यात आले. भूसंपादनाचा मावेजा मिळावा, यासाठी आलेल्या एका शेतकऱ्यासह संपाचे कारण सांगून परत पाठविण्यात आले.