लाल सोबतच पोस्टाची पेटी हिरव्या अन् निळ्या रंगाचीही असते; प्रत्येकाचा आहे वेगळा अर्थ
By साहेबराव हिवराळे | Updated: April 27, 2023 13:08 IST2023-04-27T13:07:53+5:302023-04-27T13:08:14+5:30
तुम्ही टपाल पेट्यात पत्र टाकता का आता? कोणत्या वेळी उघड्या जातात या पेट्या? घ्या जाणून

लाल सोबतच पोस्टाची पेटी हिरव्या अन् निळ्या रंगाचीही असते; प्रत्येकाचा आहे वेगळा अर्थ
छत्रपती संभाजीनगर : आता मोबाइलचा जमाना आल्याने फारसे कोणी टपालावर अवलंबून राहिलेले नाही. परंतु सरकारी पत्रव्यवहार हा आजही टपाल खात्याच्या पेट्यातूनच चालतो. जिल्ह्यात २०० तर शहरात सध्या ११८ टपाल पेट्या शिल्लक असून, ज्या ठिकाणाहून पत्रव्यवहार होत नाही, अशा टपाल पेट्या टपाल खात्याने हटविल्या आहेत.
आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, सैन्यदल तसेच शासकीय कामकाजातील पत्र टपाल खात्यामार्फतच पाठविले जातात. शहरातून दररोजचा लोकल आणि मेट्रोसिटी, कॅपिटल सिटी पत्र व्यवहार योग्य पद्धतीने चालविला जात आहे. लाल पेटी सर्वसामान्य पत्र व्यवहारासाठी तर हिरव्या, निळ्या आणि पिवळ्या पेट्यांमध्ये १० ते २० हजार एमआयडीसी, कोर्ट, सरकारी पत्रांची आदानप्रदान सुरू असते.
कोणत्या वेळी उघड्या जातात या पेट्या?
टपाल पेटी उघडण्याची वेळ पोस्टमनच्या भेटीदरम्यान असते. त्याच्याकडे किती पोस्ट पेट्यांची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे, यावर ही वेळ अवलंबून असते. औद्योगिक क्षेत्र आणि कोर्टाचा पत्रव्यवहार रोजच टपाल कर्मचाऱ्यांना तपासावा लागतो.
रोज साधारण १० हजार पत्रे जातात, १० हजार येतात
शहरात रोजच १० ते २० हजार पत्रे ये-जा करतात, त्यात कोर्ट, सरकारी तसेच औद्योगिक क्षेत्रातील पत्रांचा मोठा भर असतो. तो नियमित सुरू असतो. पोस्टाने कात टाकल्याने तो अधिक गतिमान झाला आहे.
कोणत्या रंगाच्या पेटीचा काय अर्थ?
निळी :- मेट्रो सिटी उदा. दिल्ली, चेन्नई
हिरवी : स्थानिक टपाल कार्यालय
लाल : सर्वसामान्य पत्रे
पोस्ट गतिमान झाले..
विविध रंगांच्या टपाल पेट्यांचा अर्थ वेगळा असतो. लाल रंगाच्या टपाल पेटीतून सर्वच प्रकारची पत्रे टाकली जातात. कोणत्या रंगाची पेटी कशासाठी, हे जनतेने जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
-अशोक धनवडे, प्रवर डाक अधीक्षक