भूमरेंच्या पैठणमध्ये युतीत बिघाडी; नाराजीतून भाजपच्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 07:38 PM2023-04-20T19:38:11+5:302023-04-20T19:38:36+5:30

हरिभाऊ बागडेंची मध्यस्थी व्यर्थ; कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जागा वाटपावरून शिवसेना व भाजपात बिनसल्याचे समोर आले आहे.

Alliance Breakdown in Sandipan Bhumeren's Paithan; Out of displeasure, all BJP candidates withdrew their applications | भूमरेंच्या पैठणमध्ये युतीत बिघाडी; नाराजीतून भाजपच्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतले

भूमरेंच्या पैठणमध्ये युतीत बिघाडी; नाराजीतून भाजपच्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतले

googlenewsNext

पैठण: भाजपाचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी मध्यस्थी केल्यानंतरही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपाला केवळ एकच जागा देऊ केल्याने स्वाभिमान दुखावलेल्या भाजपाने गुरूवारी सर्व उमेदवारांचे अर्ज एकाचवेळी परत घेऊन शिवसेनेला धक्का दिला आहे. 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जागा वाटपावरून शिवसेना व भाजपात बिनसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ सुनील शिंदे व भाजपाचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक शिवसेना (शिंदे गट) व भाजपाने युती करून लढावी असे दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून आदेश देण्यात आले आहेत. पैठण बाजार समितीच्या १८ जागेसाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. परंतु गुरूवारी एकाचवेळी हे अर्ज परत घेण्यात आल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.  

भाजपाला केवळ एकच जागा ( योगेश सोलाटे) देण्यात येईल एक पेक्षा जास्त जागा देण्यात येणार नाही अशी भूमिका शिवसेनेचे आमदार तथा पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी घेतली. ठरलेल्या ६०/४० फॉर्म्युल्यानुसार भाजपाच्या वाट्यास सात जागा येतात. आम्ही पालकमंत्री भुमरे यांच्याकडे केवळ चार जागा मागितल्या. यासाठी दोन वेळेस बैठका घेण्यात आल्या. परंतु, केवळ एक जागा देण्यात येईल अशी भूमिका भुमरे यांनी घेतल्याने भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व उमेदवारी अर्ज परत घेण्याचा निर्णय घेतला असे तालुकाध्यक्ष डॉ सुनील शिंदे यांनी सांगितले. 

भाजपाला प्राधान्य दिले जाईल 
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारांचे राजकीय सूत्र जमून येत नसल्याने जागा वाटपावर एकमत होत नव्हते. कारखाना, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला प्राधान्य देऊन यापुढील निवडणुकीत जागा दिल्या जातील. युतीचा धर्म दोन्ही बाजूने पाळण्यात येईल. बाजार समितीची निवडणूक आम्ही एकत्रितपणे लढणार आहोत अशी प्रतिक्रिया पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी लोकमतशी बोलताना दिल्या. 

उमेदवार नसले तरी युती धर्म पाळू
भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते निवडणुकीत युतीचा धर्म पाळतील, यात शंका नाही. जागा वाटपा वरून झालेला प्रकार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व पक्षाच्या वरिष्ठांना देण्यात आला आहे.  या संदर्भात पक्ष पुढील जो आदेश देईल त्या प्रमाणे भूमिका घेतली जाईल असे यावेळी डॉ सुनील शिंदे यांनी सांगितले. 

उमेदवारी अर्ज मागे घेतले....
गुरूवारी उमेदवारी अर्ज परत घेणाऱ्यात संतोष खराद, अशोक बोबडे, दादासाहेब घोडके, चंद्रकांत तांगडे, वैजिनाथ काळे, रघुनाथ ईच्छैय्या, शिला एरंडे, चंद्रकांत हुड, दादासाहेब मापारी, योगेश सोलाटे, गुजरणबाई ईच्छैय्या, विजय कुलकर्णी व अंकुश रहाटवाडे यांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज परत घेताना भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ सुनील शिंदे, माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे, संघटन मंत्री लक्ष्मण औटे, बप्पा शेळके, भाऊसाहेब बोरूडे, सुरेश गायकवाड, भांड, सुनील वीर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Alliance Breakdown in Sandipan Bhumeren's Paithan; Out of displeasure, all BJP candidates withdrew their applications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.