मुलांच्या सर्व लस फुकटात; मग पैसे कशाला मोजायचे? वेळापत्रकानुसार लसीकरण पूर्ण करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 19:44 IST2025-01-30T19:44:13+5:302025-01-30T19:44:22+5:30
सरकारी रुग्णालये ही सुविधा मोफत उपलब्ध करून देत असल्याने पालकांनी सरकारी यंत्रणांकडे वळले पाहिजे

मुलांच्या सर्व लस फुकटात; मग पैसे कशाला मोजायचे? वेळापत्रकानुसार लसीकरण पूर्ण करा
छत्रपती संभाजीनगर : मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने लसीकरणाला अत्यंत महत्त्व आहे. सरकारी आरोग्य सेवेतून मुलांसाठी लागणाऱ्या सर्व लसी मोफत दिल्या जातात. मात्र, खासगी रुग्णालयांमध्ये यासाठी पैसे मोजावे लागतात. छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालयामध्ये मुलांच्या आरोग्यासाठी बीसीजी, हिपॅटायटीस बी, ओरल पोलिओ, आणि पेन्टा-लसी मोफत उपलब्ध आहेत. पालकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालयाने केले आहे.
मुलांना वेळेत लस देणे आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे. पालकांनी सरकारी यंत्रणेच्या या मोफत सेवांचा लाभ घेतल्यास मुलांना रोगांपासून सुरक्षित ठेवता येईल आणि आर्थिक भारही टाळता येईल. अनेक कुटुंबांसाठी मुलांचे लसीकरण खासगी रुग्णालयात परवडण्यासारखे नसते. मात्र, सरकारी रुग्णालये ही सुविधा मोफत उपलब्ध करून देत असल्याने पालकांनी सरकारी यंत्रणांकडे वळले पाहिजे, असे तज्ज्ञांनी म्हटले.
कोणती लस कधी घ्यायची?
बीसीजी : जन्मानंतर किंवा एका वर्षाच्या आत.
हिपॅटायटीस बी : जन्मानंतर २४ तासांच्या आत.
ओरल पोलिओ : जन्मानंतर किंवा पहिल्या १५ दिवसांत.
पेन्टाव्हॅलंट १, २, ३ : ६ आठवडे, १० आठवडे आणि १४ आठवडे.
ओपीव्ही १,२,३ : ६ आठवडे, १० आठवडे आणि १४ आठवडे.
व्हिटॅमिन ए (पहिला डोस): मिजल्स-रुबेला लसीसोबत ९ महिने पूर्ण झालेले.
न्यूमोकोकल काॅन्जुगेटे व्हॅक्सीन : ६ आणि १४ आठवड्यांत २ प्राथमिक डोस, ९-१२ महिन्यांत बुस्टर डोस.
रोटाव्हायरस :६ आठवडे, १० आठवडे आणि १४ आठवडे.
जिल्हा रुग्णालयात सर्व लस मोफत
जिल्हा सामान्य रुग्णालयात ओपीडीपासून सर्व तपासण्या अगदी मोफत आहेत. मुलांसाठीच्या सर्व लसदेखील मोफत मिळतात. त्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही.
वेळापत्रकानुसार लसीकरण पूर्ण करा
जिल्हा रुग्णालयात दर सोमवार, बुधवार आणि गुरुवारी ओपीडी क्रमांक-९ मध्ये लसीकरणाचा दिवस असतो. सर्व लस मोफत देण्यात येत असून, पालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. बालकाचे माता आणि बाल आरोग्य कार्ड घेऊन रुग्णालयास भेट द्यावी. डाॅक्टरांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार लसीकरण पूर्ण करावे.
- डाॅ. पद्मजा सराफ, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक