अरेरे! कोल्हापुरी बंधाऱ्याचे गंजलेले २ दरवाजे निघाल्याने संपूर्ण पाणी गेले वाहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 14:47 IST2025-08-20T14:46:20+5:302025-08-20T14:47:44+5:30

पाणी वाहून जात असल्याने बंधाऱ्याखालील परसोडा गावात धरण फुटल्याची अफवा पसरली. त्यामुळे ग्रामस्थांची घाबरगुंडी उडाली.

Alas! The two rusty gates of the Kolhapuri dam were collapsed, causing all the water to flow away | अरेरे! कोल्हापुरी बंधाऱ्याचे गंजलेले २ दरवाजे निघाल्याने संपूर्ण पाणी गेले वाहून

अरेरे! कोल्हापुरी बंधाऱ्याचे गंजलेले २ दरवाजे निघाल्याने संपूर्ण पाणी गेले वाहून

परसोडा : वैजापूर तालुक्यातील मिरकनगर येथील कोल्हापुरी बंधाऱ्यांचे २७ पैकी गंजलेले २ दरवाजे मंगळवारी सकाळी पाण्याच्या दाबाने वाहून गेल्याने बोर नदी तुडुंब वाहू लागली.

वैजापूर तालुक्यातील कोल्ही येथील मध्यम प्रकल्पाच्या प्रक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने हा प्रकल्प रविवारी शंभर टक्के भरला. त्यामुळे या प्रकल्पातील पाणी बोर नदीवरील मिरकनगर येथील कोल्हापुरी बंधाऱ्यात जमा झाले. मंगळवारी सकाळी बंधाऱ्याच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे पाण्याचा दाब वाढल्याने या कोल्हापुरी बंधाऱ्याचे २७ पैकी गंजलेले २ दरवाजे वाहून गेले. त्यामुळे अचानक बोर नदीत मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने या नदीला पूर आला. याबाबत बंधाऱ्याखालील परसोडा गावात धरण फुटल्याची अफवा पसरली. त्यामुळे ग्रामस्थांची घाबरगुंडी उडाली. 

मंगळवारी दुपारी बोर नदी तुडुंब वाहत होती. या घटनेची माहिती मिळताच परसोडाचे उपसरपंच राजू छानवाल यांनी बंधाऱ्याची पाहणी केली. या कोल्हापुरी बंधाऱ्यांचे दरवाजे पूर्णपणे सडलेले असून, देखभाल न झाल्याने ही दुर्घटना घडली, असा आरोप छानवाल यांनी केला. या घटनेनंतर गावातील ग्रामस्थांनी बंधाऱ्याच्या दुरवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सरपंच साहेबराव बारसे, उपसरपंच राजू छानवाल, तंटामुक्त समिती अध्यक्ष सुदामसिंग छानवाल, तसेच रमेश महेर, संदीप धाडबळे, गणेश कवडे, नीलेश राजपूत, बाळू शिंदे, बाळू कवडे, उपसरपंच श्याम पवार, जनार्दन डुकरे आदी ग्रामस्थांनी एकमुखीने सिंचन विभागाकडे बंधाऱ्याला नव्याने गेट बसवण्याची व कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

तीन दशकांपासून दुर्लक्षित बंधारा
सदर कोल्हापुरी बंधारा सुमारे ३० वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्या वतीने बांधण्यात आला होता. मात्र, बांधकामाची निकृष्ट गुणवत्ता व देखभालीअभावी या बंधाऱ्यात कधीही पाणी टिकले नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना पाण्याचा अपेक्षित लाभ मिळालाच नाही.

Web Title: Alas! The two rusty gates of the Kolhapuri dam were collapsed, causing all the water to flow away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.