उमेदवार जाहीर करीत राष्ट्रवादीची (अप) छत्रपती संभाजीनगरात वेगळी चूल; महायुतीपासून दूर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 15:42 IST2025-12-17T15:40:03+5:302025-12-17T15:42:44+5:30
राष्ट्रवादी अ. प. गटाने उमेदवार जाहीर केल्यामुळे महायुतीच्या पहिल्या बैठकीला दिले नाही निमंत्रण

उमेदवार जाहीर करीत राष्ट्रवादीची (अप) छत्रपती संभाजीनगरात वेगळी चूल; महायुतीपासून दूर?
छत्रपती संभाजीनगर : महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात महायुतीच्या चर्चेत सहभागी होण्यापूर्वीच थेट वेगळी चूल मांडत काही उमेदवार जाहीर करून टाकल्यामुळे ते युतीमध्ये सामील न होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांनी वेगळी चूल मांडल्यामुळेच मंगळवारी भाजप व शिंदेसेनेच्या बैठकीला त्यांना निमंत्रित केले नसल्याचे महायुतीने स्पष्ट केले. तर दुसरीकडे रिपाइं आठवले गटाला देखील पहिल्या महायुतीच्या पहिल्या बैठकीचे निमंत्रण नसल्याने तेही नाराज झाले आहेत.
शहरातील एका हॉटेलमध्ये युतीत लढण्याच्या अनुषंगाने पहिली बैठक झाली. बैठकीत आ. प्रदीप जैस्वाल, ऋषिकेश जैस्वाल, राजेंद्र जंजाळ हे शिंदेसेनेकडून तर भाजपकडून शहराध्यक्ष किशोर शितोळे, माजी महापौर बापू घडमोडे, प्रशांत देसरडा, समीर राजूरकर यांची उपस्थिती होती.
परवा पुन्हा बैठक
सामाजिक समीकरणासह काही प्रभागांवर चर्चा झाली. महायुतीमध्येच निवडणूक लढायची आहे, हे निश्चितपणे ठरले. विरोधकांना लाभ होईल, असा कोणताही निर्णय महायुतीच्या वाटाघाटीत होऊ नये, यावर चर्चा झाली. मंगळवारच्या पहिल्या बैठकीला मंत्री, खासदार उपस्थित नव्हते, त्यामुळे उद्या किंवा परवा पुन्हा बैठक होईल. रा.काँ. अजित पवार गटाकडून प्रतिसाद मिळाला नाही, परंतु त्यांना दोन दिवसांपूर्वी मुस्लिमबहुल भागातील प्रभागांतून उमेदवार द्या, असे सुचविले होते.
-किशोर शितोळे, भाजप शहराध्यक्ष
विधानसभेत काम केल्याचे फळ असे देताहेत
पहिल्या बैठकीचे काहीही निमंत्रण नव्हते. उमेदवार जाहीर केले म्हणजे, आम्हाला आमच्या बैठकीत सांगावे लागेल की, हे उमेदवार येथून लढणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि आम्ही लढावे, अशी त्यांची इच्छा असेल तर ठीक आहे. आम्हाला निमंत्रण दिले तर जाऊ अन्यथा नाही. भाजप स्वत:ला मोठा भाऊ समजत असेल, तर आम्हा लहान भावांना त्यांनी बोलवावे. विधानसभेत त्यांच्या उमेदवारांसाठी घेतलेल्या मेहनतीचे असे फळ देत आहेत.
-अभिजित देशमुख, शहराध्यक्ष, अजित पवार गट
राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केले
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चर्चा न करताच उमेदवार जाहीर करीत असतील, तर लक्षात येत आहे की, त्यांना काय करायचे आहे. त्यांनी एक-दोन उमेदवार जाहीर केले. त्यांच्या डोक्यात आमच्यासोबत यायच्या ऐवजी दुसरा काहीतरी विचार सुरु असेल. मंगळवारच्या पहिल्या बैठकीत महायुती करण्यावर एकमत आहे. जागावाटपाचा समन्यायाने निर्णय होईल.पुढील दोन दिवसांत बैठका होतील.
...राजेंद्र जंजाळ, शिंदेसेना जिल्हाप्रमुख
आम्ही देखील उद्या उमेदवार जाहीर करू
महायुतीच्या प्राथमिक बैठकीसाठी आम्हाला निमंत्रण नव्हते. आमच्या पक्षाची बुधवारी बैठक आहे. त्यांना आम्हाला सोबत घ्यायची इच्छा नसेल तर आम्हीदेखील बुधवारी उमेदवार जाहीर करू.
...नागराज गायकवाड, रिपाइं (आ), शहराध्यक्ष