शिकारीतून सापडला सांस्कृतिक खजिना; अजिंठा लेण्या पुन्हा प्रकाशात येण्याला २०६ वर्षे पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 12:23 IST2025-04-28T12:20:39+5:302025-04-28T12:23:27+5:30

Ajanta Caves Rediscovery: अजिंठा लेणीचा पुन्हा शोध: बिबट्या, शिकार आणि शिल्पसौंदर्याची कहाणी

Ajanta Caves Rediscovery: Cultural treasure found during hunting; 206 years since Ajanta Caves came to light again | शिकारीतून सापडला सांस्कृतिक खजिना; अजिंठा लेण्या पुन्हा प्रकाशात येण्याला २०६ वर्षे पूर्ण

शिकारीतून सापडला सांस्कृतिक खजिना; अजिंठा लेण्या पुन्हा प्रकाशात येण्याला २०६ वर्षे पूर्ण

- श्यामकुमार पुरे

सिल्लोड ( छत्रपती संभाजीनगर): २८ एप्रिल १८१९. वाघूर नदीच्या काठावर शिकारीसाठी आलेल्या ब्रिटीश लष्करी अधिकारी मेजर जॉन स्मिथने एका बिबट्याचा पाठलाग करताना अजिंठा लेणीच्या १० व्या गुहेत प्रवेश केला आणि जगासमोर अजिंठ्याच्या अद्भुत शिल्पसौंदर्याचा पुन्हा एकदा शोध लागला. आज, सोमवारी या ऐतिहासिक घटनेला २०६ वर्षे पूर्ण झाली.  

आज ज्याचं अप्रतिम शिल्पवैभव आणि चित्रकलेने अख्या जगाला भुरळ घातली आहे, ती अजिंठा लेणी हजारो वर्षांचा समृद्ध वारसा जपत आहे. ब्रिटिश आणि मराठ्यांमध्ये १८०३ मध्ये असई येथे झालेल्या युद्धानंतर या भागात इंग्रज अधिकाऱ्यांचा वावर वाढला होता. जंगलात वाघ व बिबटे असल्याने अधिकारी शिकारीसाठी येथे येत असत.  

मेजर जॉन स्मिथदेखील अशाच एका शिकार मोहिमेवर होता. बिबट्याच्या मागावर जाताना, अजिंठा डोंगरात लतावेलींच्या फडफडीत दडलेल्या गुहेत शिरताच त्याच्या नजरेसमोर आले एक अनमोल शिल्प! विस्मित झालेल्या स्मिथने १० व्या लेणीतील एका स्तंभावर आपलं नाव आणि भेटीची तारीख कोरली, जी आजही क्षीण स्वरूपात दिसते. त्यानंतर स्मिथने अजिंठ्याच्या लेण्यांचे उत्खनन सुरू केले आणि तब्बल तीस लेण्या जगासमोर आल्या.

अजिंठा लेणीचा इतिहास
अजिंठा लेणींची निर्मिती इसवीपूर्व १५० ते इसवी सन १०० या काळात झाली. तब्बल सहाशे वर्षांच्या कालखंडात अनेक पिढ्यांनी ही भव्य शिल्पकृती साकारली. येथील चित्रकृती मुख्यतः भगवान बुद्धाच्या जीवन प्रसंगांवर आधारित आहेत. १९८३ साली अजिंठा लेणींना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला.

रॉबर्ट गिलचे योगदान
१८४४ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने रॉबर्ट गिल याची नेमणूक अजिंठ्याच्या चित्रकृती जतन करण्यासाठी केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गिलने स्थानिक आदिवासी महिला पारोच्या मदतीने या लेण्यांची चित्रे चितारली आणि १८७३ मध्ये हा ठेवा ब्रिटिश सरकारकडे सुपूर्द केला.

वारसा जपण्याची जबाबदारी
मेजर जॉन स्मिथ यांच्या योगे विस्मृतीत गेलेली अजिंठ्याची अद्वितीय संपत्ती पुन्हा उजेडात आली. आजही या जागतिक वारसास्थळाचे संवर्धन आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे. पर्यटकांसाठी अजून सोयीसुविधा वाढवल्यास, हे अद्भुत शिल्पवैभव आणखी प्रभावीपणे जगासमोर मांडता येईल.
- विजय पगारे, स्थानिक इतिहास संशोधक

Web Title: Ajanta Caves Rediscovery: Cultural treasure found during hunting; 206 years since Ajanta Caves came to light again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.