तिशी ओलांडली, कमी पगारामुळे नवरी मिळेना;शेतकरी मुलाचे तर आणखीनच कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 16:54 IST2022-03-15T16:53:08+5:302022-03-15T16:54:26+5:30
‘लोकमत’ने शहरातील तीन वधू-वर सूचक मंडळाची आकडेवारी पाहिली. यात साधारण ५० टक्के तरुण तिशी पार आढळले.

तिशी ओलांडली, कमी पगारामुळे नवरी मिळेना;शेतकरी मुलाचे तर आणखीनच कठीण
- स. सो. खंडाळकर
औरंगाबाद : विविध कारणांमुळे वयाची तिशी ओलांडली तरी लग्ने होत नाहीत. शिक्षण पूर्ण होऊन जाऊ दे, चांगली नोकरी मिळू दे, चांगल्या पॅकेजची प्रतीक्षा आहे, चांगला पगार नाही, या कारणांमुळे लग्नाचे वय कधी हातातून निसटते, हेही कळत नाही. दुसरीकडे लग्न उशिरा करणे, ही जणू फॅशनच होतेय की काय, अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्याला तर नवरीच मिळणे कठीण होत चालले आहे.
... म्हणून वाढतेय विवाहाचे वय
पूर्वीच्या काळी शिक्षणापेक्षा वेळेत लग्नाला महत्त्व दिले जायचे. आता मुले- मुली व त्यांचे आई-वडील शिक्षणावर भर देत आहेत. पूर्वी पारंपरिक शिक्षण घेतले की, नोकऱ्या मिळत असत. आता नेट- सेट, पीएच. डी, एमपीएससी, यूपीएससी तसेच इंजिनिअर व डॉक्टर होण्यावर भर देण्यात येत आहे. यास बराच कालावधी लागत असल्याने तिशी येते.
वकिलाला वकील, डॉक्टरला हवा डॉक्टर
वकिलाला वकील, डॉक्टरला हवा डॉक्टर हे तर आता सूत्र बनून गेले आहे. रंग, गोत्र व इतर बाबीतही तडजोड होताना दिसत नाही. आजही गोऱ्या मुला- मुलींनाच पसंती आहे. मंगळ असेल तर लग्न जुळणे कठीण होते.
५० टक्के तरुण तिशी पार
औरंगाबाद शहरात वधू-वर सूचक मंडळे अनेक आहेत. सातत्याने वधू-वर परिचय मेळावेही भरवणारी मंडळे आहेत. ‘लोकमत’ने शहरातील तीन वधू-वर सूचक मंडळाची आकडेवारी पाहिली. यात साधारण ५० टक्के तरुण तिशी पार आढळले.
१० टक्के चाळिशी पार
तिशी उलटल्यानंतर घाई करून, मनावर घेऊन व स्थळ संशोधनावर भर देऊन अनेकांचे लग्न जुळूनही जातात; परंतु चाळिशी पार केलेले वधू-वर तसेच राहिलेले आहेत, त्यांचे लग्न जुळण्यात वय हाच अडथळा ठरतोय, अशी परिस्थती आहे. ‘लोकमत’ने शहरातील तीन वधू-वर सूचक मंडळांची आकडेवारी पाहिली. यात साधारण १० टक्के तरुण चाळिशी पार आढळले.
अपेक्षा वाढल्या (वधू-वर सूचक मंडळ चालकांच्या प्रतिक्रिया)
मुली अधिक शिकल्या, त्यांना त्यांच्या लेव्हलचाच वर हवा असतो. असे स्थळ शोधण्यात बराच वेळ जातो.
- रवी साळुंके
जातीअंतर्गत पोटजाती, अटी बऱ्याच आहेत. त्यामुळे अडचणी निर्माण होतात. दोन्ही बाजूंनी अपेक्षा उंचावत असल्याने लग्न जुळण्यासाठी वेळ लागतो.
- बन्सीलाल पुसे
लग्नात तडजोडीला फार महत्त्व आहे; पण त्या होत नसल्याने अडचणींमध्ये वाढ झालेली बघावयास मिळते.
- सुधाकर बोधगावकर