आंतरजातीय विवाहानंतर बहिण माहेरी परतली, संतापलेल्या भावाने मेव्हण्याला भररस्त्यात संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 13:45 IST2022-12-30T13:44:31+5:302022-12-30T13:45:47+5:30
ऑनर किलिंग: इसारवाडी फाट्यावरील थरारक घटना; बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याचा भावाच्या डोक्यात राग

आंतरजातीय विवाहानंतर बहिण माहेरी परतली, संतापलेल्या भावाने मेव्हण्याला भररस्त्यात संपवले
वाळूज महानगर (औरंगाबाद) : बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याने मनात धुमसणारा राग साल्याने कुऱ्हाडीने सपासप घाव घालून मेव्हण्याचा खून करून काढला. ही खळबळजनक घटना गुरुवारी (दि. २९) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास औरंगाबाद-नगर महामार्गावरील इसारवाडी फाट्यावर घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी मेव्हणा बाबासाहेब उर्फ बापू छबुराव खिल्लारे (३०, रा. भोकर, ता. श्रीरामपूर) याचा घटनास्थळी मृत्यू झाला. आरोपी साला सचिन शामराव नाटकर (२५, रा. भोकर) यास पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली.
बाबासाहेब छबूराव खिल्लारे यांनी पाच वर्षांपूर्वी सचिनची बहीण हिना हिच्यासोबत आंतरजातीय विवाह केला होता. याचा राग सचिनमध्ये धुमसत होता. वादामुळे बाबासाहेब हा पत्नीला सोबत घेऊन प्रवरासंगम येथे राहण्यास गेला होता. या दाम्पत्यास एक मुलगा होऊन तो मरण पावल्याने पती - पत्नीत खटके उडू लागले. वर्षभरापासून हिना पती बाबासाहेब यास सोडून माहेरी गेली होती. त्यामुळे सचिनचा पारा चांगलाच चढला होता. अशातच बाबासाहेबाचा त्याच्या आई-वडिलांसोबत वाद झाल्याने तो मंगळवारी (दि. २७) भाऊ नंदू खिल्लारे (रा. सारंगपूर, ता. गंगापूर) याला भेटण्यास आल्याची संधी सचिनने साधली.
भररस्त्यावर खून
बाबासाहेब हा सारंगपूरला आल्याची कुणकुण लागताच सचिन गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास इसारवाडी फाट्यावर आला. तेथे बाबासाहेबासह त्याचा भाऊ नंदू व भावजय शोभा हे तिघे हुरडा विक्री करीत होते. सचिन त्याच्यावर पाळत ठेवून होता. काही वेळानंतर नंदू कामानिमित्त निघून गेल्यावर बाबासाहेब चहा पिण्यासाठी इसारवाडी फाट्यावर चालला होता. दबा धरून बसलेल्या सचिनने रस्त्यावरच बाबासाहेबावर कुऱ्हाडीने हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी बाबासाहेब सैरावैरा पळत असताना सचिनने कुऱ्हाडीने त्याच्या मानेवर सपासप वार केले. बाबासाहेब हा गंभीर जखमी होऊन रस्त्यावरच निपचित पडला. हल्ल्यानंतर सचिन घटनास्थळावरून दुचाकीवरून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त अशोक थोरात, पोलिस निरीक्षक सचिन इंगोले, उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, शेवाळे, सहायक फौजदार नारायण बुट्टे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून गंभीर जखमीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच बाबासाहेबाची प्राणज्योत मालवली होती.
मृताच्या भावजयला कुऱ्हाड दाखवत आरोपी पळाला
दीरावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच भावजय शोभा मदतीला धावून गेल्या. यावेळी हल्लेखोर सचिनने रक्ताने माखलेली कुऱ्हाड त्यांना दाखवत मी बदला घेतला, अशी खूण दाखवून अहमदनगरच्या दिशेने सुसाट पसार झाला. रात्री उशिरा वाळूज पोलिसांनी आरोपी सचिन नाटकर यास नगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले.