रूई-कल्हाळी रस्त्याचे काम उद्घाटनानंतर ठप्पच
By Admin | Updated: April 18, 2016 00:42 IST2016-04-18T00:30:50+5:302016-04-18T00:42:22+5:30
नांदेड : कंधार तालुक्यातील रूई- कल्हाळी या रस्त्याचे काम उद्घाटनानंतर अद्याप सुरूच झाले नसून कामाअभावी कंधार तालुक्यातील अनेक मजुरांनी गावे सोडली आहेत़

रूई-कल्हाळी रस्त्याचे काम उद्घाटनानंतर ठप्पच
नांदेड : कंधार तालुक्यातील रूई- कल्हाळी या रस्त्याचे काम उद्घाटनानंतर अद्याप सुरूच झाले नसून कामाअभावी कंधार तालुक्यातील अनेक मजुरांनी गावे सोडली आहेत़ रोहयोची कामे मागणी करूनही सुरू झाली नसून इ- मस्टरही दिले जात नाही़ जिल्ह्यातील सेवाभावी संस्थांनी केलेल्या पाहणीत दुष्काळी परिस्थितीतही प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे़
मराठवाडा जनता विकास परिषद आणि परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने कंधार तालुक्यातील, पानभोसी, बहाद्दरपुरा, फुलवळ, कळका, कल्लाळी आदी गावांमध्ये भेटी देवून माहिती घेण्यात आली़ उपरोक्त गावात मजुरांच्या मागणीनंतरही मनरेगांची कामे सुरू झाली नाहीत़ अंबुलगा येथील नाला खोलीकरणाचे कामही थातूरमातूर करण्यात आले आहे़
त्याचवेळी अर्धवट केटीवेअरच्या कामामुळे दलित वस्तीत पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे़ त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे़ मन्याड नदीत बहाद्दरपुऱ्याजवळ बंधारा उभारण्याची तसेच कंधार येथील जगतुंग समुद्रातील काळ काढून पाणीप्रश्न सोडविता येवू शकतो, असेही स्पष्ट करण्यात आले़
बारूळ धरणातही मृत जलसाठाच शिल्लक असल्याने पाणीप्रश्न गंभीर झाला आहे़ कल्लाळीतील परिस्थितीबाबतही संस्थांनी चिंता व्यक्त केली असून हैदराबाद मुक्तिसंग्रामात २५ हुतात्मे या गावचे झाले आहेत़ तेथे असलेल्या स्मारकाची दुरवस्था झाली आहे़ प्रशासनाने याबाबीची गंभीर दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे़
या दुष्काळदौऱ्यात माजी खा़ व्यंकटेश काब्दे, प्रा़ नाना शिंदे, भगीरथ शुक्ला, डॉ. किरण चिद्रावार, सूर्यकांत वाणी, बळवंत मोरे, एऩ जी़ पटणे, भाऊ मोरे, दिगांबर पेटकर आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)