‘मोक्का’च्या गुन्ह्यात जामीन मिळताच कुख्यात गुंड टिप्यासह टग्या, बादशहाकडून लूटमार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 20:02 IST2025-08-04T20:02:06+5:302025-08-04T20:02:16+5:30
टिप्या ऊर्फ जावेद शेख याची पुंडलिकनगरसह गारखेडा परिसरात प्रचंड दहशत आहे. त्याच्याविरोधात आतापर्यंत विविध पोलिस ठाण्यांत २५ गुन्हे दाखल आहेत.

‘मोक्का’च्या गुन्ह्यात जामीन मिळताच कुख्यात गुंड टिप्यासह टग्या, बादशहाकडून लूटमार
छत्रपती संभाजीनगर : पुंडलिकनगरसह परिसरात दहशतीच्या जोरावर लुटमार करणारा कुख्यात गुंड टिप्या ऊर्फ जावेद मसूद शेख याच्यासह टग्या, बादशाहसह सातजणांच्या टोळीने एकास लुटले. दुचाकीसह २ लाख ५० हजार रुपये बळकावल्याचा प्रकार शनिवारी रात्री दहाच्या सुमारास साईनगर परिसरात घडला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
आरोपींमध्ये टिप्या (रा. विजयनगर), भूषण, अर्जुन पाटील (रा. राजे चौक), टग्या, बादशहासह दोन अनोळखी साथीदारांचा समावेश आहे. शेख अझर शेख गनी (रा. गारखेडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते प्लॉटच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. शनिवारी रात्री आठच्या सुमारास मोपेडवरून (एमएच २० एफएक्स २८२४) मित्र अब्रार शेख हसन याच्यासह बीड बायपासवरील स्पाइस ट्री हॉटेलमध्ये गेले. त्यावेळी फिर्यादीच्या खिशात अडीच लाख रुपये होते. फिर्यादीसह मित्र हॉटेलमध्ये जाण्यापूर्वीच टिप्यासह अर्जुन पाटील हे दोघे समोरच्या टेबलवर दारू पीत बसलेले होते. टिप्याने अर्जुनच्या कानात काहीतरी सांगितल्यानंतर तो निघून गेला. काही वेळाने टिप्यासह दोघे हॉटेलबाहेर आले. शेख अझर स्वत:च्या, तर मित्र टिप्याच्या गाडीवर पाठीमागे बसला. टिप्याने अब्रारला दुचाकी साईनगरकडे घेण्यास सांगितले. तिघे १० वाजण्याच्या सुमारास तेथे आले. त्या ठिकाणी आधीच टग्या, बादशहासह आणखी दोन अनोळखी लोक बसले होते. काही वेळातच टिप्याने अकारण अझरला चापट मारली. मारहाणीचे कारण विचारताच दोघांना चौघांनी मारहाण सुरू केली. खिशातील सर्वच पैसे मागितले. नकार देताच टिप्याने फोन करून अर्जुन पाटील आणि भूषण यांना तलवार आणण्यास सांगितले. काही मिनिटांतच दोघे तलवार घेऊन आले. टिप्याने तलवार हातात घेत खिशातील अडीच लाख रुपये हिसकावले. अझर व अब्रार हे पळून जाण्याचा प्रयत्न करू लागताच सर्व आरोपींनी दोघांना अडवले. तलवारीचा धाक दाखवून सकाळपर्यंत एक लाख रुपये घेऊन आला नाही तर जिवे मारण्याची धमकी दिली. टग्याने अझरची मोपेड दुचाकी जबरदस्तीने नेली. गुन्हा नोंदविल्यानंतर अधिक तपास पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.
२५ गुन्हे अन् नागरिकांमध्ये दहशत
टिप्या ऊर्फ जावेद शेख याची पुंडलिकनगरसह गारखेडा परिसरात प्रचंड दहशत आहे. कारागृहातून बाहेर आल्यानंतर तो सहकाऱ्यांसह हॉटेल व्यावसायिकांसह इतरांना धमकावतो. त्यांच्याकडून खंडणी उकळतो. त्याशिवाय जीवघेणे हल्लेही करतो. त्याच्याविरोधात आतापर्यंत विविध पोलिस ठाण्यांत २५ गुन्हे दाखल आहेत. त्याशिवाय आतापर्यंत पाच प्रतिबंधात्मक कारवाया केलेल्या आहेत. दोन वेळा एमपीडीए ॲक्टअंतर्गत कारागृहातही ठेवण्यात आलेले आहे. तरीही त्याच्या गुन्ह्यांचा आलेख वेगाने वाढत आहे.
आठ महिन्यांनी कारागृहाबाहेर
टिप्याने नोव्हेंबर २०२४ मध्ये सेव्हन हिल येथे पोलिसांसमोरच हाणामाऱ्या करून लुटमार केली होती. तेव्हा त्याच्याविरोधात मोक्काची कारवाई करण्यात आली होती. आठ महिन्यांनंतर टिप्या कारागृहाबाहेर आला आहे. त्याने बाहेर आल्यानंतर पुन्हा लुटमार सुरू केली. त्याच्या अटकेसाठी पुंडलिकनगर पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आले आहे.